सातारा : पन्नास हजारांची खंडणी दिली नाही म्हणून येथील समर्थ मंदिर परिसरात एका ट्रकचालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याची घटना बुधवारी घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोगदा परिसरातील राजू नलावडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झाली नव्हती. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र धोंडिबा शेडगे (वय ५०, रा. ४४२, मंगळवार पेठ, सातारा) यांचा स्वत:चा ट्रक असून, चालक म्हणून तेच आहेत. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी राजू नलवडे (रा. बोगदा परिसर, सातारा) याने शेडगे यांच्याकडे पन्नास हजारांची खंडणी मागितली होती. ती त्यांनी दिली नव्हती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रामचंद्र शेडगे समर्थ मंदिर येथे उभे होते. याचवेळी राजू नलवडे येथे आला आणि त्यांने ‘पन्नास हजार का दिले नाहीस,’ याची विचारणा केली. रामचंद्र शेडगे यांनी त्यास नकार देताच राजू नलावडे यांनी शेडगे यांच्या हातावर कोयत्याने वार केला आणि दगडाने मारहाण केली. आरडाओरडा झाल्यानंतर राजू नलावडे येथून पळून गेला. दरम्यान, ही माहिती शेडगे यांच्या मुलाला समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वडिलांना अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात राजू नलावडेवर खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. रात्री उशिरापर्यंत तो पोलिसांना सापडून आला नव्हता. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविराज घाडगे करत आहेत. (प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत शोधट्रकचालक रामचंद्र शेडगे यांच्यवर कोयत्याने वार झाल्याचे समजातच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर राजू नलवडेचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
खंडणी दिली नाही म्हणून कोयत्याने वार
By admin | Published: November 19, 2014 9:53 PM