सातारा : ‘सध्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बरीच चर्चा होत आहे. कारखान्याचे सभासद शेतकरी, शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडू नये म्हणून सुनेत्रा शिंदे यांनाच साथ देतील आणि जर शेतकरी सभासदांना स्वत:चा आत्मघात करायचा असेल, तर त्यांना विरोध करतील, याबाबत आमचा निर्णय आम्ही ज्या-त्या वेळेस जाहीर करू,’ अशी स्पष्टोक्ती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रतापगड कारखान्यासंदर्भात बरीच चर्चा होत आहे. तथापि, कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, त्याचा जरंडेश्वरसारखा गुरू मिळून, कारखाना खासगी होऊ नये, सभासदांचा मालकी हक्क हिसकावला जाऊन शेतकरी परागंदा होऊ नये, म्हणूनच सुनेता शिंदे यांनी प्रतापगड कारखाना भुर्इंजला चालवायला देऊन कर्जमुक्त केला. सहकारी कारखान्यांबाबत राजकारणापलीकडे जाऊन, शेतकरी हिताची भूमिका त्यांनी घेतली असेल ते निश्चितच रास्त म्हणावे लागेल, त्यामुळे स्वार्थासाठी काही व्यक्ती सहकारी तत्त्वापासून बहकले जाऊन, प्रतापगड खासगी होण्यासाठी प्रयत्नशील असतील तर शेतकरी संबंधितांना त्यांची जागा दाखवून देतील. उदयनराजे म्हणाले, ‘डोंगरी आणि दुर्गम म्हणून ओळखल्या गेलेल्या जावळी तालुक्यात, शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता नांदावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुंबईला चाकरनाम्या म्हणून कामासाठी जायला लागू नये या उदात्त आणि धीरोदात्त धोरणातून दिवंगत लालसिंगराव शिंदे यांनी कारखान्याचे स्वप्न साकार केले. सहकारी तत्त्वावरील कारखाने येनकेन प्रकारे अडचणीत आणून ते लिलावात काढून, आपणच पडतळीत विकत घेऊन खासगी कारखाना म्हणून आहे, त्याच पद्धतीने चालवायचा अशा घृणास्पद प्रकाराचे मोठे रॅकेट त्यावेळी राज्यात कार्यरत होते व आजही काही प्रमाणात आहे. फक्त आज त्यांना सत्तेची ऊब नाही. याच रॅकेटने जरंडेश्वर खासगी करून घशात घातला. प्रतापगडची अवस्था तशीच करावयाची होती, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रतापगड कारखाना दुसऱ्या कारखान्यास भाडेपट्ट्याने चालवण्यास देण्याबाबतची शासनाची परवानगी मिळवण्यात आम्ही आमचा सहकार्यात्मक खारीचा वाटा केवळ शेतकरी हित समोर ठेवून उचलला. म्हणूनच कारखाना खासगी होण्यापासून लांबला गेला आणि आज कर्जमुक्त झाला आहे. (प्रतिनिधी)
‘प्रतापगड’चा ‘जरंडेश्वर’ करू नका
By admin | Published: March 09, 2015 9:40 PM