मोहन मस्कर-पाटील -सातारा -शिक्षक दाम्पत्य अतिशय सुखकारक आणि भाग्यवान मानले जात असलेतरी समाजाच्या नजरेतून ‘डबल इंजिन’ (दोन पगार घेणाऱ्या व्यक्ती) म्हणून होणारी हेटाळणी नको वाटते, अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षक दाम्पत्यांची आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनेक शिक्षक दाम्पत्यांच्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणी या अनुषंगाने बोलल्यानंतर अनेकांनी समाजाच्या नकारात्मक दृष्टिकोनावर भाष्य केले.सातारा जिल्ह्यात आजमितीस आठ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी पंधराशेच्या आसपास शिक्षक दाम्पत्य आहेत. जिल्हा परिषद वगळता अन्य खासगी शिक्षण संस्थांमध्येही शिक्षकांची संख्या जिल्हा परिषद शाळांइतकीच तितकीच आहे. अनेकदा काही ठिकाणी पत्नी जिल्हा परिषद शाळेत तर पती खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक अथवा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. काही प्रमाणात हे चित्र उलटेदेखील आहे. रयत, स्वामी विवेकानंद, भारती विद्यापीठ आदी मोठ्या संस्थांमध्येही काही शिक्षक दाम्पत्य आढळून येतात. या संस्थामंध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांच्या शिक्षिका पत्नी अथवा शिक्षिकांचे शिक्षक पती इतरत्र कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक दाम्पत्यांची आकडेवारी लक्षात घेता ती अडीच हजारांच्या पुढे आहे.शिक्षक दाम्पत्य म्हणजे समाजात फार भाग्यवान मानले जाते. दोन पगार असल्यामुळे समाजामध्ये त्यांची तुलना ‘डबल इंजिन’ म्हणून केली जाते. ही बाब शिक्षकांना नेहमीच खटकत असल्याचे अनेक शिक्षक सांगतात. त्याला कारणेही अनेक आहेत. गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे वाढलेले पगार आणि त्यामुळे घरी आलेली संपन्नता शेजारी आणि ते जेथे राहतात त्यांच्या नजरेतून कधीच सुटलेली नाही. घरी ऐश्वर्य नांदत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. काही शिक्षक मंडळी वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. शिक्षक दाम्पत्य असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच आहेत. आर्थिक संपन्नता दारी येत असलीतरी अनेकदा मुलांच्या शिक्षणासाठी मात्र खासगी शिकवणीवर भर द्यावा लागतो. ज्या खेडेगावातून पुढे आलेले असतो, त्या परिसराकडे अथवा येथील माणसांकडे लक्ष देणेही फारसे जमत नाहीत. ही देखील खंत अनेक शिक्षक दाम्पत्यांची आहे. पूर्वी बदल्या होताना एकाच तालुक्यात शिक्षक दाम्पत्यांना नियुक्ती मिळावी म्हणून आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. आता नवीन नियमावलीमुळे ही समस्या थोडीफार कमी झाली आहे.शिष्यवृत्तीचे यश हे दाम्पत्यामुळेचसातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ज्या शाळेतील मुले चमकली त्यापाठीमागे शिक्षक दाम्पत्यच होती. पती-पत्नी शिक्षक असल्यामुळे गुणवत्तापूर्ण अध्ययन करतात, त्यामुळेच शिष्यवृत्ती निकालाचे चित्र नेहमीच चांगले दिसले. जावळी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये हे चिक्ष पाहायला मिळाले. समाजातील काही घटकांना शिक्षकांना मिळणारे वेतन दिसते. मात्र, त्यामागे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी आणि त्याचबरोबर अशैक्षणिक कामांचा ढिगारा कधी दिसत नाही. याची नेहमीच खंत वाटते. नोकरी करत असताना अनेकदा कुटुंबांकडे दुर्लक्ष होते. - शामराव वाघमोडे, भारती वाघमोडे (कुमठे)पती-पत्नी शिक्षक आहेत, म्हणून आमच्या कुटुंबांमध्ये अथवा आम्हाला स्वत:ला त्याचा अभिमान वाटतो. मात्र, समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्यासारखे वाटते. शिक्षकांच्या सामाजिक सुरक्षिततेचाही विचार करायला हवा असे, आम्हाला वाटते. - विठ्ठल माने, रजनी माने (वाई)
‘डबल इंजिन’ म्हणून हेटाळणी नको वाटत
By admin | Published: September 04, 2014 11:37 PM