फलटण : ‘ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचनांची अंमलबजावणी करावी,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला नियोजनासंदर्भात फलटण येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. नियोजनाच्या आढावा बैठकीत सुविधांच्या अपूर्णतेबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधित विभागप्रमुखांना व शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करून तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.लाखो भाविक वारकऱ्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामासह सातारा जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. या कालावधीतील शासकीय नियोजनाचा आढावा घेण्यासाठी फलटण येथील सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे-पाटील व यांच्यासह फलटण उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार विवेक जाधव, गटविकासाधिकारी नीलेश काळे उपस्थित होते.जिल्ह्यातील संपूर्ण पालखी मार्गावर रस्ते रुंदीकरण, साईडपट्ट्या भरून घेणे, रस्त्याच्या कडेची झाडेझुडपे काढणे, रस्त्यावरील खड्डे भरणे, पर्यायी रस्ते दुरुस्ती करणे, तरडगाव येथील अर्धवट उड्डाण पुलाच्या बांधकामातील बाहेर आलेल्या सळ्या वाकवून घेणे, उभे रिंगण होणाऱ्या ठिकाणी रोड दुभाजक भरून घेणे, ओढ्यावरील साईडपट्ट्या भरून बॅरिगेट करणे बाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या.आरोग्य विभागास सूचना देताना वैद्यकीय अधिकारी वाढवा, प्रथमोपचार पेट्या उपलब्ध करून देणे, पाणी निर्जंतुक करणे, रुग्णवाहिकांचे योग्य नियोजन करावे, स्वच्छतेचे फलक लावा, मोबाईल टॉयलेटमध्ये स्वच्छता राखण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.पालखी मार्ग व मुक्कामाच्या गावात वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने व गावाबाहेरच एसटीची वाहतूक करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तर पालखी काळात लोणंद, फलटण परिसरात विजेचे लोडशेडिंग न करण्याच्या सूचना वीजवितरण कंपनीला देण्यात आल्या.नीरा कॅनॉलवरील फलटण येथील दोन्ही पुलांवरमध्ये दुभाजक करून एका बाजूने वारकरी व दुसऱ्या बाजूने वाहने जाण्याबाबतची सोय करण्याचे सांगून, वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी व नगरपालिकेने कंट्रोल रूम करून माहिती घेण्याचेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.सोहळ्याच्या निमित्ताने १२ हजार लिटरचे ४ टँकर रॉकेल व ५००० गॅस सिलिंडर मागविले असल्याचे फलटणचे तहसीलदार विवेक जाधव यांनी सांगितले.यावेळी पालखी सोहळ्याचे विश्वस्त सरनाईक यांनी स्वागत कमानीचा अडथळा, पालखी तळावर दुपारांचे पाण्याच्या टँकरची गरज, पाण्यातील ‘टीसीएल’चे योग्य प्रमाण याबाबत सूचना केली. (प्रतिनिधी)३२ टँकरची सोय पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ३२ टँकरचे नियोजन केले आहे. दिंडीचालकांच्या टँकरर्सना पाणी पुरवठ्यासाठी लोणंद, तरडगाव व येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, फलटण नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना व खासगी विहिरींमधून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर नीरा उजवा कालव्यामध्ये दि. १४ जुलैपासूनच पाणी सोडले जाणार आहे.
वारकऱ्यांच्या सेवेत कसूर नको
By admin | Published: July 02, 2015 10:38 PM