सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावरील विजेचे दिवे बंद आहेत. रस्त्याची जागोजागी दुरवस्था आहे. अंडरपासमध्ये घाणीचे साम्राज्य साठलेय. तर जे फ्लायओव्हर ब्रीज आहेत, तिथेही विजेची सोय नाही. लोकांनी महामार्गावर फिरताना कंदील लावूनच फिरायचे का?, असा संतप्त सवाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये केंद्रीय योजनांवर विशेष चर्चा झाली. महामार्गाचे प्रश्न तसेच जलजीवन मिशनमधील रखडलेले प्रस्ताव यावर विशेष चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ ते शेंद्रे या अंतरामध्ये ज्या दुरवस्था आहेत, त्यावर बैठकीत विशेष चर्चा झाली. केंद्र शासनाशी केलेल्या करारानुसार महामार्गाच्या देखभालीचा खर्च संबंधित कंत्राटदाराने करायचा आहे. गरजेच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कामे करावीत, त्याला केंद्राकडून निधी किंवा मंजुरीची आवश्यकता पडल्यास आपण आणू, पण कामे रखडवलेली खपवली जाणार नाही. लोकसभेत मुद्दा मांडला तर तुम्हाला अडचणीचे ठरेल, असा इशाराच खासदार पाटील यांनी दिला.
ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. यामध्ये तेथील गावांतील जनावरांचा समावेश करून प्रस्ताव तयार करावा. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहिजे या हेतूने अधिकाऱ्यांनी काम करावे. याबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी.
प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबित कामे लवकरात लवकर करावी. रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीमध्ये सातारा जिल्ह्याचे चांगले काम झाले आहे. या कामांची सक्सेस स्टोरी तयार करावी. तसेच समितीच्या सदस्यांच्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात मला द्याव्यात. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे दर्जेदार करा. याबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत कामे करताना गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन करावीत, अशा सूचना आमदार महेश शिंदे यांनी केल्या.
चौकट..
‘किसान सन्मान’चे पैसे शेतकऱ्यांना मिळेनात
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करुनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी सूचना खासदार पाटील यांनी केली.
फाेटोनेम : ०८झेडपी
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा सनियंत्रण समितीची बैठक झाली.