सातारा : कोरोनामुळे भाविकांची रेलचेल थांबल्याने वाई तालुक्यातील मांढरदेव व भोर घाटात वावरणाऱ्या शेकडो माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाद्याच्या शोधार्थ या माकडांचा मानवी वस्तीत वावर वाढू लागलाय. माकडांची ही परवड थांबविण्यासाठी मांढरदेव ग्रामस्थ मंडळ व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी दोन दिवसांत तब्बल पाचशे किलो केळी माकडांना खाऊ घातली आहेत.
सध्या कोरोना हा विषाणू जगापुढील चिंतेचा बनला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र चांगलाच फटका बसलाय. अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांची अन्नधान्यावाचून ससेहोलपट सुरू आहे. यावर उपाय म्हणून अनेक शासनाकडून अशा कुटुंबांना धान्य दिले जात आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था व संघटनांही मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाची ही झळ जशी मनुष्याला बसली आहे, तशीच ती मुक्या प्राण्यांनाही बसली आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव तसेच भोर घाटात माकडांची संख्या अधिक आहे. शिवाय मांढरदेव येथील मंदिर परिसरातही खाद्य मिळत असल्याने माकडांचा सतत वावर असतो. मांढरदेवला देव दर्शनासाठी येणारे भाविक येता-जाता या माकडांना खाऊ घालतात. त्यामुळे या माकडांना आता मनुष्याचा लळा लागलाय. परंतु संचारबंदीमुळे सर्व मंदिरे अन् भाविकांचे दर्शनही बंद झाले आहे. त्यामुळे या माकडांना भाविकांकडून मिळणारे खाद्य आता मिळत नाही.कोणीतरी येईल आणि आपल्याला खाऊ देईल, या आशेवर माकडांची टोळी घाटात वावरत असते.
खाद्य, पाण्याविना या मुक्या प्राण्यांची सुरू असलेली होरपळ थांबविण्यासाठी मांढरदेव ग्रामस्थ मंडळ व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या तरुणांनी एक पाऊल पुढे टाकले. या तरुणांनी प्रारंभी वर्गणी गोळा करून शेतकºयांकडून अल्पदरात तब्बल पाचशे किलो केळी खरेदी केली. मंदिर परिसर, मांढरदेव व भोर घाटात वावरर्णाया दीडशे ते दोनशे माकडांना हे केळी खाऊ घातली. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने या तरुणांनी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थाही केली आहे.