फलटण (जि. सातारा) : पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या फलटण येथील डॉ. संजय राऊत यांची पुणे ग्रामीण पोलीस दल, फलटण शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत बारामती तालुक्यातील काटेवाडीजवळ अवघ्या आठ तासांत सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सातपैकी तिघा आरोपींना अटक केली आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान झालेल्या झटापटीत बारामती गुन्हे शोध पथकाचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
या अपहरण आणि मारहाणप्रकरणी इक्बाल बालाभाई शेख (वय ३५, रा. कोळकी, ता. फलटण) अजहर अकबर शेख (वय २४, रा. भडकमकरनगर, फलटण), महेश धनंजय पाटील (वय २३, रा. कांबळेश्वर, ता. फलटण) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. किशोर आवारे, विशाल महादेव ठोंबरे (रा. फलटण), समीर भैय्या नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर), बाळा कुंभार (रा. कांबळेश्वर, ता. बारामती) हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, फलटण येथील सिद्धनाथ हॉस्पिटलचे डॉ. संजय राऊत यांचे खंडणीसाठी दि. १९ रोजी रात्री दहाच्या सुमारास ते लाईफलाईन हॉस्पिटलमधून घरी जात होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी सोनवलकर हॉस्पिटलसमोर मारहाण करून त्यांचे कारमधून अपहरण केले. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली.
अपहरण केल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकाला फोन करून ५ कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले. एवढी मोठी रक्कम मागितल्याने व्यवस्थापकाला संशय आला. अधिक चौकशी करता डॉ. राऊत हे कोठेच दिसत नसल्याने संशयावरून व्यवस्थापकाने अधिक चौकशी करून फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, अन्यथा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. डॉक्टरांचे अपहरण झाल्याने फलटण शहर पोलिसांनी तपासाची गतीने चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस पथके तयार करण्यात आली. मोबाईल लोकेशनवरून आरोपी बारामती भागाकडे गेल्याचे समजताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली.
डॉक्टरांच्या मोबाईल फोनवरूनच खंडणीसाठी फोन केला जात होता. त्यामुळे आरोपींचे लोकेशन काढणे पोलिसांना सोपे झाले. हे आरोपी बारामती परिसरात असल्याचे लक्षात आल्यावर बारामती येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गुन्हे शोध पथकाला याची माहिती देण्यात आली.
आरोपींनी सुरुवातीला बारामती शहरातील महालक्ष्मी शोरुमजवळ पैसे घेऊन बोलावले होते. त्यानंतर ठिकाण बदलत बदलत आरोपींनी काटेवाडी, ता. बारामतीजवळ बोलावले. या ठिकाणी बारामतीचे गुन्हेशोध पथक, फलटण शहर पोलीस ठाणे, सातारा एलसीबी यांनी काटेवाडीजवळ सापळा लावला आणि आरोपींच्या गाडीवर छापा टाकला. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चार आरोपी फरार झाले. तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.