सातारा : शासकीय कामात अडथळा आणत जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सातारा येथील संग्राम संस्थेची आर्या पुजारी, हीना पवार तसेच अन्य तीन तृतीयपंथी आणि एक अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, डॉ. प्रकाश पोळ (वय ६०, रा. कर्मवीर कॉलनी, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवार, दि. ७ रोजी दुपारी बारा वाजता आर्या पुजारी, हीना पवार तसेच समवेत असलेले तृतीयपंथी व अन्य एका अनोळखी व्यक्तीने ११ नंबरच्या ओपीडीमध्ये डॉ. पोळ वैद्यकीय सेवा देत असताना त्यांच्या कामात अडथळा आणला. त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असणाऱ्या वैद्यकीय साहित्याची मोडतोड केली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्येही डॉ. पोळ यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबतची तक्रार डॉ. पोळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.