सातारा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वरिष्ठांची पदे रिक्त आणि कर्मचारीसंख्या अपुरी असली तरी सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी मात्र आहेत. प्रत्येकी दोनप्रमाणे अधिकारी नियुक्त असून सध्या एकच पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहे. कोरोना विषाणूमुळे डॉक्टरांची पदे भरण्यात आली असून आरोग्य यंत्रणा सक्षमचा हा एक भाग आहे.
कोरोना विषाणूमुळे आरोग्य विभागाचे महत्त्व चांगलेच अधोरेखित झाले आहे. पहिल्या लाटेच्या काळातच आरोग्य विभाग किती महत्त्वपूर्ण काम करू शकतो हे स्पष्ट झाले. तसेच कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य विभाग सक्षमतेवर भरही दिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ४०० हून अधिक उपकेंद्रे कार्यरत आहेत. या ठिकाणी कर्मचारी वर्ग कमी आहे. पण, आरोग्य अधिकाऱ्यांची सर्व पदे भरण्यात आली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर ९१ कार्यरत होते. यामधील एक पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले आहे, तर बीएएमएस पदवी घेतलेले ५३ डॉक्टर आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग डॉक्टरांच्या बाबतीत पॉवरफुल झाला आहे.
....................
- कोरोना काळातील नियुक्त्या ३१
- ग्रामीण भागातील नियुक्त्या ३१
- हजर झाले ३१
...........................
दोघांची नियुक्ती...
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा डोलारा हा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उभा असतो. अधिकारी जर केंद्रात योग्य प्रमाणात असतील तर रुग्णांना दुसरीकडे जावे लागत नाही. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असत. पण, कोरोना संकटामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व पदे भरण्यात आली. एका प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन अधिकारी असे प्रमाण आहे. सध्या ७२ केंद्रे असून १४४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. पण, काही दिवसांपूर्वी एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे एकच पद सध्या रिक्त आहे.
.....................................
वैद्यकीय अधिकारी मिळण्याचे कारण...
काही वर्षांपूर्वी वैद्यकीय पदवी घेणाऱ्यांचा कल शासकीय सेवेत येण्याचा नव्हता. कारण, वेतन कमी आणि ड्युटीवर सततच राहावे लागायचे. त्यातच घर, गावांपासून दूर जावे लागत असे. म्हणून नियुक्ती होऊनही अनेकजण हजर होत नव्हते. पण, अलीकडील काळात शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी मिळू लागले आहेत. कारण, वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर बाँडप्रमाणे एक वर्ष शासकीय आरोग्यसेवा करावी लागत आहे. नाहीतर दंड भरावा लागतो. त्यातच वेतनात वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय सेवेत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
.........................................
कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत माझी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. कोरोनाकाळात लोकांना आरोग्यसेवा देता आली. तसेच त्यांच्यावर उपचार करताना कोठेही आम्ही कमी पडलो नाही. सध्या वेतन वाढल्याने शासकीय आरोग्य सेवेत येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
.........................................
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रत्येक तालुक्यात आहेत. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना सेवा दिली जाते. या सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी योग्य प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत झाली आहे.
- डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
.................................................................................