जगदीश कोष्टी
सातारा : कोरोनाला हरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जंबो कोरोना सेंटरची उभारणी केली. साताऱ्यातील या केंद्रामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण आनंदात घरी जावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल चारशेहून अधिक जणांचे पथक अहोरात्र झटत आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, मावशी, विविध तपासणी करणारे तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.
कोरोनाचा शिरकाव झाला अन् आरोग्य विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. एका-एका श्वासासाठी संघर्ष करणारा एखादा रुग्ण घेऊन नातेवाईक येतात तेव्हा सारेजण हतबल झालेले असतात. प्रत्येकजण डॉक्टरांकडे मोठ्या आशेने पाहत असतो. हे चित्र गेल्या सहा महिन्यांपासून साताऱ्यातील कोरोना सेंटरमध्ये पहायला मिळत आहे.
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात होती. तेव्हा या केंद्रात कर्तव्य बजावणारे डॉक्टर परिचारिका यांना सात दिवसांच्या कामानंतर सात दिवसांची विश्रांती दिली जात होती परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुट्टी अशी मिळतच नाही. ही मंडळी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. दाखल होताना श्वास घेण्यासाठी धडपडणारा सुखरूप बरा होऊन घरी जाताना डॉक्टरांना हातवारे करून निरोप घेतो तेव्हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप काही सांगून जाते असा अनुभव येथे काम करणाऱ्यांना येत असतो. हेच समाधान येथे काम करणाऱ्यांना लढण्याचं बळ देत आहे.
चौकट
विशेष रुग्ण सुखरूप
येथे काम करताना दररोज नवा अनुभव घेत असतो. याच काळात कोरोना बाधित झालेले २० विशेष रुग्ण दाखल झाले. त्यांचे शरीर हे खूपच संवेदनशील असते त्यातच हे रुग्ण कधी कशाप्रकारे वागतील याचा नेम नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे हे मोठे आव्हान ठरले होते. परंतु येथील विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब पवार यांनी विशेष पथक तयार केलं. हे पथक या रुग्णांच्या शरीरातील सुधारणा आणि हालचालींवर लक्ष ठेवून होते. आणि या प्रयत्नांना यशही आले. हे रुग्ण बरे झाल्यानंतर केक कापून आनंद साजरा केला.
कोट
सातारा जम्बो पूर्ण सेंटरमध्ये सहा महिन्यांमध्ये सुमारे २८०० रुग्ण दाखल झाले होते. त्यातील २६०० हून अधिक रुग्ण सुखरूपपणे घरी पोहोचले आहेत. याठिकाणी कर्तव्य बजावत असणारे सर्वच कर्मचारी अधिकारी हे जीव धोक्यात घालून कित्येक तास पीपीई किट परिधान करून कर्तव्य बजावत आहेत. या प्रत्येकाच्या योगदानामुळेच आरोग्यसेवा देण्यात आम्हालाही यश येत आहे.
- डॉ. भाऊसाहेब पवार
वैद्यकीय प्रमुख, जम्बो कोरोना सेंटर सातारा