कराड : टेंभू योजना शामगाव हद्दीतून जात असून शासनदरबारी या योजनेतून पाणी वाटपाचा वापर कमी दिसत आहे. शासनाकडून तो दिला जात नाही. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी शामगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांनी शामगाव ते कराड असे पायी चालत आक्रोश मोर्चा काढला.
यावेळीं मोठया संख्येने महिला, युवक, ग्रामस्थ मोर्च्यांत सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे अश्या घोषणा आक्रमक झालेल्या महिला व ग्रामस्थानी दिल्या. पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यातच, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकंती करावी लागत आहे. तर, आज विधानभवनातही पाण्याची मुद्दा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी पाणी नियोजनात सरकार फेल गेल्याच म्हटलं आहे.