महाबळेश्वर : रानडुकराच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेला गावठी बॅाम्ब तोंडात फुटल्याने एक पाळीव कुत्रा जागीच ठार झाला. जर हा बॅाम्ब लहान मुलाच्या हाती पडला असता तर मात्र मोठा अनर्थ ओढवला असता. वन विभाग बॉम्ब ठेवणाऱ्या अज्ञात शिकाऱ्याचा शोध घेत आहे.
येथील गणेशनगर हौसिंग सोसायटीजवळच माउंट डग्लस हा बंगला आहे. बंगल्याच्या मागे छोटे मैदान आहे. या मैदानावर सोसायटीतील मुले क्रिकेट खेळण्यास नियमित जात असतात. याच ठिकाणी स्वप्नील गजानन फळणे हे क्रिकेट खेळायला जातात. स्वप्नील खेळायला जाताना आपल्याबरोबर कुत्रा घेऊन गेले. मुलं क्रिकेट खेळण्यात मग्न असताना स्वप्नील यांचा कुत्रा जवळच्या जंगल परिसरात फिरत होता. खरखटे पडले होते तेथे अन्नपदार्थाच्या वासाने कुत्रा आकर्षित झाला आणि त्याने ते खाण्यास सुरुवात केली. त्याच खाद्यपदार्थात काही अज्ञात शिकारी लोकांनी गावठी बाॅम्ब ठेवला होता. कुत्राने बाॅम्ब तोंडात घेताच बाॅम्बचा स्फोट झाला. या स्फोटाने कुत्र्याच्या तोंडाच्या चिंधड्या उडाल्या व अन् त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्फोटाचा आवाज ऐकताच क्रिकेट खेळणारी मुले त्या आवाजाच्या दिशेने धावत गेली; परंतु तिथे पोहोचल्यावर सर्वांनाच धक्का बसला. स्वप्नील यांचा कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
शिकारी याच सोसायटीमधील असावेत असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बाॅम्ब ठेवून प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी बाॅम्बवर खाद्यपदार्थ, खरकटे टाकायचे व प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस खायचे अशी युक्ती शिकारी करतात; परंतु या ठिकाणी जंगली प्राण्यांऐवजी कुत्रा सापडला. मुलांच्या हाती हा बाॅम्ब लागला तर तर मोठा अनर्थ ओढावल्याशिवाय राहणार नाही.
यासंदर्भात स्वप्नील फळणे यांनी महाबळेश्वर वन विभागात आपली तक्रार दाखल करून अज्ञात शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.