शामगाव : परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. शामगाव, अंतवडी, रिसवड, करवडी आदी गावांमध्ये वीस ते तीस अशा मोठ्या संख्येने श्वान गावात व शिवारात फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत. लहान मोठे अपघात होत आहेत. मोकाट श्वानांकडून पाळीव जनावरांवर हल्ला केला जात आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य
मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतरही चर बुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.
पिकांचे नुकसान
रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्ता खचल्याने धोका
शामगाव : अंतवडी (ता. कऱ्हाड) येथील अंतवडी ते मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत विहीर आहे. त्या ठिकाणी रस्ता खचला आहे. परिणामी येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे.