सातारा : यंदाच्या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत विजयी स्पर्धकांच्या स्वागतासाठी डॉल्बी अथवा डीजे सिस्टीम असावी, असे काही जणांचे मत होते; मात्र, प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचा मान राखत संयोजकांनी मॅरेथॉनमध्ये डॉल्बी बिलकूल वाजू दिली नाही. गणेशोत्सव कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.ते सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख होते. पुढे बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, या स्पर्धेचे सर्व संयोजक समाजातील प्रतिष्ठित व प्रस्थापित आहेत. ते कसे वागतात, यावर साताऱ्यातील बाकीचे सर्वसामान्य कार्यकर्ते आपली भूमिका ठरवितात. त्यामुळे स्पर्धेत आम्ही डॉल्बी वाजविली असती तर गणेशोत्सवातही विनाकारण वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. प्रशासनाच्या भूमिकेमुळे या वर्षी गणेशोत्सवात डॉल्बी वाजणार नसली तरी किमान पुढच्या वर्षी तरी याचा विचार व्हावा.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, सातारा मॅरेथॉनने जगात जिल्ह्याचे नाव नेले आहे. या स्पर्धेमुळे साताऱ्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यातही या स्पर्धेला प्रशासनाचे मनापासून सहकार्य राहील.कार्यक्रमाला डॉ. संदीप काटे, कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सुधीर शिंदे, आश्विनी देव, सुचित्रा काटे, अविनाश पाटील, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. दीपक थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)
केवळ गणेशोत्सवासाठी मॅरेथॉनमध्येही डॉल्बीबंदी
By admin | Published: September 25, 2015 10:25 PM