वाई : वाई पालिकेने गणेशमूर्ती दान उपक्रमास गणेशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. विसर्जनाच्या पाचव्यादिवशी शहरातील नागरिकांनी ११० गणेशमूर्ती पालिकेला दान केल्या. या सर्व मूर्तींचे सिद्धनाथवाडी येथील कृत्रिम तळ्यात विधिवत विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेच्यावतीने खबरदारी घेण्यात आली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मूर्ती पालिकेला दान कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी कृष्णा नदीवरील सर्व घाटांवर व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले; तर नागरिकांकडून ११० मूर्ती पालिकेला दान करण्यात आल्या. या मूर्तींचे कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात आले.
पालिकेच्यावतीने कृष्णा नदीवरील सातही घाटांवर निर्माल्य कलश व मूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्ती नदीत विसर्जित न करता त्या दान कराव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले आहे.
फोटो : १५ वाई
पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी वाई शहरातील गणेश भक्तांनी पालिकेला गणेशमूर्ती दान केल्या.