पुसेगाव : येथील सेवागिरी महाराजांचे भक्त सातासमुद्रापार असल्याचे बुधवारी निघालेल्या रथोत्सवात स्पष्ट झाले. बुधवारच्या रथोत्सवात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर देणगी टाकली. नोटाबंदीच्या काळातही श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर एकाच दिवसात अर्धा कोटीपेक्षा जादा रुपयांची देणगी अर्पण झाली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, भुतान, नेपाळ, थायलंड, दुबईसह अनेक देशांतील चलनांचा समावेश आहे. सेवागिरी महाराजांच्या ६९ या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. रथमिरवणुकी दरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंडसह विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या. एवढ्या मोठ्या देणगी रक्कमेत चलनातून बाद झालेल्या पाचशेच्या ५ आणि एक हजाराच्या ४ नोटाच मोजणीत आढळून आल्या. या रक्कमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांची संख्या अधिक होती. २ जानेवारीपर्यंत यात्रा सुरू राहणार असल्याने देणगीच्या रक्कमेत वाढ होणार आहे.‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक भक्तांच्या संख्येत वर्षानुवर्षे लाखोने वाढ होत आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरूपात देणगी अर्पण करतात. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने तसेच सध्या देशात नोटाबंदी असतानाही येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लावून श्रींच्या रथावर मोठ्या मनोभावे दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांच्या माळा अर्पण केल्या. देशात नोटांचा तुटवडा असतानाही रथावर देणगी किती जमा होणार याबाबत लोकांना उत्सुकता लागली होती. रथावर जमा झालेली रोकड पोलिसांनी बंदोबस्तात श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या देखरेखीखाली देणगीची रक्कम मोजण्यात आली. (वार्ताहर)सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये थायलंडच्या २३० बात, युनायटेड अरब अमिरातीच्या धीरमच्या ५ नोटा, कतारचा ५ रियाल, युरो ५ नोटा, इंग्लंडचे ५ पौंड, युएसएची डॉलरच्या ३३ नोटा, दुबईच्या २१ चलनी नोटा तसेच कुवेत, बांग्लादेशच्याही नोटांचा समावेश आहे.रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरिता बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, न्यू सातारा समूह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-आॅप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चट पतसंस्था, शिवशक्ती पतपेढी व विविध बँका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वयंसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले.
सेवागिरी रथोत्सवात ५० लाखांची देणगी..
By admin | Published: December 29, 2016 10:34 PM