पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ७२ या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी एकाच दिवसात ५९ लाख ६० हजार ३४१ रुपयांची देणगी रथावर मनोभावे अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटांचाही समावेश होता.पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. बुधवारी रथोत्सवाच्या दिवशी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. आपला नवस पूर्ण व्हावा किंवा बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरुपात देणगी अर्पण करतात. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी १०, २०, ५०, १०० तसेच २००० रुपयांच्या नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून मिरवणूक सुरू झाल्यापासून रथ नोटांच्या माळांनी झाकाळून गेला.
मिरवणूक संपूवन रथ रात्री दहा वाजता मंदिरात पोहोचला. नोटांनी शृंगारलेल्या रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आल्या. पोलिसांच्या बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे पावणेचार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले. एकाच दिवसात ५९ लाख ६० हजार ३४१ रुपयांची देणगी अर्पण करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ३ लाख ४७ हजार रुपयांची वाढ झाली. ३१ डिसेंबरपर्यंत यात्रा सुरूच राहणार असून, या काळातही देणगी रकमेत वाढ होणार आहे.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या देखरेखीखाली बँक आॅफ महाराष्टÑ, स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, न्यू सातारा समूह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-आॅप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चंट पतसंस्था, शिवशक्ती पतपेढी व विविध बँका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वंयसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.