मसूर : ‘एखादे अपयश आल्यामुळे आपण संपत नाही. आपण संपतो ज्यावेळी आपले प्रयत्न थांबतात. त्यामुळे जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आयुष्याच्या रणांगणातून माघार घेऊ नका,’ असे मत प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा, वाघेश्वर, ता. कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख नसीमा संदे, मुख्याध्यापक मंगल शेवाळे, उपशिक्षक दिगंबर कुर्लेकर उपस्थित होते.
बाबर म्हणाले, ‘आजची युवा पिढी एका वेगळ्या वळणावर आहे. प्रगतीच्या नादात आम्ही आपल्या संस्कारांचा हात पाठीमागे सोडत आहोत. युवा पिढीने प्रगतीची आस धरली पाहिजे; पण हे करीत असताना या मातीने दिलेले संस्कार आम्ही विसरता कामा नयेत. आजच्या युवा पिढीसमोर आम्हांला शिवसंस्कारांचे विचार मांडायला पाहिजेत; कारण शिवचरित्र हा आमचा भूतकाळ नाही, तर तो आमचा वर्तमानकाळ आहे; त्यामुळे आमच्या उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी शिवचरित्र आम्हाला वर्तमानात जगता आले पाहिजे.’
विनोद बाबर म्हणाले, ‘युवा पिढीचं जगणं, मरणं त्यांच्या हातातील मोबाईल नावाचं यंत्र ठरवू लागलं आहे. आमच्या युवकांनी मोबाईलमधील आदर्श शोधण्यापेक्षा इतिहासाच्या पानांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शोधावा. संस्कार आम्ही विसरता कामा नयेत.’
शबनम मुजावर म्हणाल्या, ‘वाघेश्वर शाळेने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना उद्याच्या भविष्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण झाले आहे.’
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय सावंत यांनी प्रास्तविक केले. मनोज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जया अनिल पाटील यांनी आभार मानले.