सातारा : पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या अनेकांना निसर्गासह स्वत:ला कॅमेऱ्यात कैद करण्याची सवय लागली आहे. बेस्ट फोटो येण्यासाठी जिवावर बेतणारे फोटोशूट करणाऱ्या महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे पर्यटनाच्या नव्या ठिकाणांना कॅमेऱ्यात कैद करताना ते अखेरचे छायाचित्र होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे
परतीचा पाऊस चांगला झाल्याने सर्वत्रच निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारे धबधबे बघायला जाता अंगावर येणाऱ्या पावसाच्या सरी वातावरण एकदमच बदलतात. निसर्गाच्या सान्निध्यात गाडीतून किंवा गाडीवरून जाणाऱ्यांची संख्या वाढतेय. कुटुंबीयांबरोबर जाण्यापेक्षा फुल ऑन एन्जॉय करण्यासाठी मित्र-मैत्रिणींबरोबर जाणे तरुणाई पसंत करते. एकमेकांना चिडवणं, टिंगल करणं याबरोबरच धाडस दाखविण्याच्या नादात पाय घसरून पडण्याचे प्रकार या दिवसांत होतात.
पावसाळी पर्यटनासह मोह आवरता येत नसल्यामुळे आपसूक पावले निसर्गनिर्मित्त धबधब्याकडे वळतात. कोरोनामुळे शासकीय निर्बंध लावण्यात आल्याने धबधब्यावरील गर्दी सध्या तरी थांबली आहे. मात्र, उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यात भिजताना तसेच धबधब्यासमोर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद वेगळा असतो. अशा वेळी पाय घसरून पडण्याचा धोका असल्याने सेल्फी जिवावर बेतू शकते.
चौकट
धोक्याची सूचना वाचायला वेळच नाही!
धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूचना फलक लावले आहेत. सूचना फलक असतानाही त्यावरील सूचनांचे पालन केले जात नाही. मित्रमंडळीसमवेत मौजमस्ती करताना सूचनांचा विसर पडतोय. उंचावरून पाणी पडत असल्याने अंदाज घेऊनच पुढे जावे.
जबाबदारी कोणाची?
पर्यटन स्थळांवर गेल्यावर तिथल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यटकांनी जबाबदारीचे भान राखून आपला जीव धोक्यात जाईल, असे कोणतेही कृत्य करू नये. धोकादायक ठिकाणांची माहिती देण्याची जबाबदारी पर्यटनस्थळ व्यवस्थापकांची आहे, तर तिथं घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आणि उत्साह नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पर्यटकांची आहे.
फलकांकडे होतेय दुर्लक्ष
जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी कास, बामणोली, ठोसेघर, चाळकेवाडी यासह पाटण तालुक्यात फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक पर्यटनस्थळावर ठिकठिकाणी धोक्याची माहिती देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, एन्जॉय करण्याच्या असुरी कल्पनेमुळे या फलकांकडे कोणीच बघत नाही.
ठोसेघर धबधबा परिसरात मृतांची माहिती
सातारा तालुक्यातील ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी राज्यासह परराज्यांतूनही पर्यटक येतात. या परिसरात लाल माती असल्याने ती घसरते, याचा पर्यटकांना अंदाज नाही. त्यामुळे ठोसेघर वन व्यवस्थापन समितीने येथे याबाबत सूचना फलकाद्वारे माहिती झळकवली आहे. याबरोबरच धबधबा पाहायला येणाऱ्या ज्या पर्यटकांचा अपघाती मृत्यू झालाय, त्यांची माहिती छायाचित्रासह फलकावर लावण्यात आली आहे.
कोट :
पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा ठोसेघरकडे चांगलाच वाढलेला दिसतो. पूर्वी झालेल्या अपघातांमधून धडे घेत आम्ही आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे अपघात झाले नाहीत. अतिउत्साही पर्यटकांवर चाप बसविण्यासाठी व्यवस्थापन समिती लक्ष ठेवून असते.
- शंकरअप्पा चव्हाण, अध्यक्ष, ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती