फलटण : ‘लक्षणे दिसताच चाचणी करून घ्या. पॉझिटिव्ह आलात तर लगेच विलगीकरण कक्षात दाखल व्हा. अधिक त्रास असेल तर रुग्णालयात जा, मात्र कोणत्याही परिस्थितीत मला काही होणार नाही. या भ्रमात राहून स्वतः आणि कुटुंबाबरोबर गावाला कोरोनाच्या खाईत लोटू नका,’ असा इशारा महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून ढवळपाटी, वाखरी (ता. फलटण) येथील उपबाजार समिती आवारातील कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या मोफत कोरोना विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. या वेळी बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘कोरोनामधून सहीसलामत बाहेर पडायचे असेल, आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी असेल तर शासन, प्रशासन, ग्रामदक्षता समिती यांच्या सूचनांचे पालन करावे लागेल. आता घरात नव्हे, गावातील अथवा लगतच्या विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. तेथे सर्व सुविधासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. गरज असेल तर तेथूनच रुग्णालयात दाखल केले जाईल, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था, गरजेनुसार औषधे इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्यात शासन प्रशासन आणि आम्ही कोठेही कमी पडणार नाही. मात्र तुम्ही पॉझिटिव्ह असूनही घरातच राहिलात तर कठीण प्रसंग उद्भवेल, त्यातून संपूर्ण कुटुंब, गाव, तालुका मोठ्या संकटात सापडण्याचा धोका लक्षात घेऊन वेळीच चाचणी करून घ्या. बाधित आलात तर लगेच उपचार घ्या.’
रामराजे म्हणाले, ‘फलटण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक याप्रमाणे कोरोना उपचार व विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. फलटण येथे उपजिल्हा रुग्णालय व कोरोना उपचार केंद्रे सुरू केली आहेत. गरज वाटल्यास सातारा, कऱ्हाड, पुणे येथे पाठवून उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत चाचणी (टेस्ट) करून घ्या. बाधित असाल तर लगेच उपचार करा. नव्याने आलेला म्युकरमायकोसिस आणखी घातक आहे. त्याच्या उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे.’
उपसभापती भगवानराव होळकर यांनी स्वागत केले. सचिव शंकरराव सोनवलकर यांनी आभार मानले. प्रा. नवनाथ लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार : रघुनाथराजे
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने विविध सेवा, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापलीकडे जाऊन या तालुक्यात शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैद्यकीय सेवासुविधांपासून वंचित राहू नये म्हणून महाराजा मालोजीराव मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी बाजार समितीच्या आवारात करण्यात येत आहे. लवकरच दर्जेदार वैद्यकीय सेवेचे दालन फलटणकरांच्या सेवेत दाखल होत आहे,’ अशी माहिती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
३१रामराजे
ढवळपाटी येथे आयोजित विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)