लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. पण ही उक्ती केवळ कागदावर राहते. रक्तदानाबाबत काहींना उत्सुकता असते परंतु त्याभोवती असलेले गैरसमज आणि भीती यामुळे अनेकजण त्यापासून दूर राहतात. म्हणूनच तुमच्या मनातून रक्तदानाबाबतचे हे काही गैरसमज दूर करा आणि रक्तदानासाठी एक पाऊल पुढे या.
अनेकांच्या मनामध्ये रक्तदान करताना त्रास होतो, असा मोठा गैरसमज आहे. मात्र, रक्तदानाच्या दरम्यान सुईचा वापर केला जातो. ती हातावर टोचली जाते मात्र हा त्रास क्षणिक असतो. त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. आणखी एक गैरसमज तो म्हणजे रक्तदानानंतर आरोग्य बिघडते, थकवा येतो. पण यामध्ये तथ्य नाही. उलट एका संशोधनानुसार, रक्तदान केल्यानंतर कार्डियोव्हसक्युलर आजारांचा धोका कमी होतो. शरिरात अतिरिक्त आयर्न साचून राहण्याचा धोका कमी होतो. रक्तदानापूर्वी दात्याची चाचणी केली जाते. ज्यामधून वैद्यकीय धोके, हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते. दात्याचे हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅम परसेंटपेक्षा कमी असेल किंवा अन्य व्याधींचे निदान झाल्यास तुम्ही रक्तदान करण्यास पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे हाही गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. बऱ्याचदा अनेकांकडून म्हटले जाते, रक्तदानानंतर शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. मात्र, असे कदापी होत नाही. रक्तदान केल्याने शरिरात मूळीच त्याची कमतरता निर्माण होत नाही. रक्तदानानंतर ४८ तासांत ती झीज भरून निघते. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास आणि संतुलित आहार घेणार्या व्यक्ती दर तीन महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून चारवेळेस रक्तदान करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे कोणतेही गैरसमज बाळगू नयेत. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो, यासारखे समाधान आयुष्यात कोणतेच नाही. त्यामुळे रक्तदानासाठी हिरिरीने प्रत्येकाने सरसावले पाहिजे.
चाैकट : आपल्या मनातील हे आहेत ‘बोल’
गैरसमज : माझा रक्तगट विशेष नाही. त्यामुळे माझ्या रक्तदानामुळे फारशी मदत होईल, असे मला वाटत नाही.
वस्तूस्थिती : सतत शस्त्रक्रिया, अपघातानंतरच्या उपचारांमध्ये रक्ताची गरज भासते. त्यामुळे विशेष रक्तागटासोबतच सामान्य रक्तगटाचीदेखील गरज सातत्याने भासते.
गैरसमज : रक्तदानानंतर दिवसभर आराम करणे गरजेचे आहे.
वस्तूस्थिती : रक्तदानानंतर काही वेळातच तुम्हाला पुन्हा काम करण्याची मुभा दिली जाते. मात्र, त्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.
रक्तदानानंतर २४ तासांमध्ये किमान १०-१२ ग्लास पाणी किंवा इतर द्रव्यपदार्थ घ्यावेत.
रक्तदानानंतर २-३ दिवस मद्यपान टाळा.
रक्तदानानंतर ३-४ तास वाहन चालवणं, फार काळ उन्हात राहणे, धुम्रपान करणे टाळा.
गैरसमज : रक्तदानानंतर लठ्ठपणा वाढतो.
वस्तूस्थिती : रक्तदानाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. प्रमाणापेक्षा अधिक खाऊन व्यायाम न केल्यास वजन वाढू शकते.
गैरसमज : मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे मी रक्तदान करू शकत नाही.
वस्तूस्थिती : रक्तदानाच्या वेळेस तुमचा रक्तदाब १८० ते १००पेक्षा कमी असल्यास तुम्हाला ती संधी दिली जाते. तुम्ही रक्तदाबावर घेत असलेल्या गोळ्यांवर काहीवेळेस हे अवलंबून असते.
गैरसमज : मला मधुमेहाचा त्रास असल्यास मी रक्तदान करू शकत नाही.
वस्तूस्थिती : डॉक्टरांच्या मते, मधुमेहीदेखील रक्तदान करू शकतात. परंतु, रक्तदानाच्या वेळेस तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये असणे आवश्यक आहे.
गैरसमज : रक्तदान करण्याइतका मी तरूण नाही.
वस्तूस्थिती : रक्तदान करण्यासाठी किमान वयाचे बंधन असले तरीही कमाल वयाचे काहीच बंधन नाही. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास तुम्हाला रक्तदान करण्याची परवानगी आहे.
गैरसमज : रक्तदानामुळे एचआयव्हीचा धोका वाढतो.
वस्तूस्थिती : रक्तदानादरम्यान स्टरलाईझ केलेल्या सुया वापरल्यास रक्तातून पसरणार्या इन्फेक्शनचा धोका नक्कीच कमी होतो. एकच सुई परत वापरली जात नाही. त्यामुळे निश्चितच हा धोका नाही.