प्रगती जाधव-पाटील ।सातारा : आरोग्याच्या बाबत सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून साताऱ्याचा उल्लेख होतो. प्रदूषणासह सर्वच पातळ्यांवर अनेकांना सातारा सेफ वाटतो; पण तरीही आरोग्यदायी अन्न म्हणून महागनरांमध्ये सेंद्रिय भाज्यांची धूम असताना सातारकरांना मात्र या भाज्यांविषयी माहितीच नसल्याचे सर्र्वेक्षणातून समोर आले आहे.
वर्ये, ता. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट महाविद्यायातील विद्यार्थी प्रिया जाधव हिने शहराचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर तपासून तीन भाग केले. या तिन्ही भागातील सुमारे एक हजार सातारकरांशी तिने संवाद साधला. तब्बल तीस प्रश्नांची जंत्री घेऊन तिने सातारकरांना बोलते केले. तब्बल तीन महिने तिने या विषयावर काम केले आहे. प्रियाच्या संशोधनामध्ये तिला अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला.
नैसर्गिक पद्धतीने व सेंद्रिय खते यांचा वापर करून पिकविलेली भाजी सेंद्रिय भाजी म्हणून बाजारात उपलब्ध आहे. खतांचा अतिरेकी वापर आणि त्यामुळे जडणारे आजार यांपासून सुटका मिळविण्यासाठी सेंद्रिय भाजी उपयुक्त असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. साताºयातील बहुतांश घरांमध्ये भाजी खरेदी करण्याचा निर्णय महिलाच घेतात. यातील केवळ २६ टक्के महिलांनाच सेंद्रिय भाजीविषयी माहिती असून, त्या ही भाजी घरपोच मागवतात. ७४ टक्के लोक भाजी मंडईतूनच आणतात. उच्च आर्थिक स्तरामध्ये याविषयीची जनजागृती मोठ्या प्रमाणावर आहे. त्या तुलनेत सामान्य आणि अतिसामान्य कुटुंबामध्ये याविषयी विशेष जागृती नाही. काही कुटुंबांना याची माहिती आहे. पण भाजी कुठून घ्यायची याविषयी ते अनभिज्ञ आहेत.
सामान्य स्तरांतील चार जणांच्या कुटुंबाला महिन्याला सरासरी ४१४ रुपयांची भाजी लागते. उच्च आर्थिक स्तरांमध्ये सेंद्रिय भाजी घेणाऱ्यांना आठवड्याचा भाजीचा खर्च सहाशे रुपयांपर्यंत जातो. हा खर्च आत्ता जास्तीचा वाटत असला तरी कायमस्वरूपी जडणाºया आजारांवरील उपचारांच्या तुलनेत हा खर्च अगदी नगण्य ठरतो.
साता-यात सेंद्रिय भाजीविषयी पुरेशी माहिती देण्यासाठी विविध केंद्र आणि सोशल मीडियाचा वापर होणं आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयीन तरुणाई उत्तम पर्याय ठरू शकतात. सेंद्रिय भाजी उत्पादन करणाºया शेतकºयांना त्यांची भाजी इथेच घेणारा ग्राहक मिळाला तर वाहतुकीवर होणारा अवाढव्य खर्च कमी करून सेंद्रिय भाजी सामान्य भाजी प्रमाणचे सर्वांना परवडेल, अशा किमतीत साताºयात उपलब्ध होऊ शकेल, असा कयासही या सर्वेक्षणात मांडला आहे.
होम डिलिव्हरीला मिळतेय पसंतीसेंद्रिय भाजीविषयी माहिती असणार आणि ही भाजी खरेदी करणारा वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे या स्तरातील लोक आॅनलाईन बुकिंग आणि होम डिलिव्हरीला प्राधान्य देतात. भाजी किती रुपयांची आहे, यापेक्षा ती स्वच्छ निवडलेली आणि उच्चतम दर्जाची असणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. अशी भाजी मंडईत जाऊन शोधण्यापेक्षा ती खात्रीशीर आॅनलाईन घेणं त्यांना अधिक सुरक्षित वाटतं.
खात्रीशीर भाजीची अजनूही वानवाच !आॅनलाईन किंवा मंडईत काहीजण स्वत:कडे सेंद्रिय भाजी असल्याचं सांगतात; पण ही भाजी प्रत्यक्षात सेंद्रिय आहे का, हे तपासण्याचं कोणतंही प्रमाण त्यांच्याकडे नाही. त्यामुळे वाढीव दराने साधी भाजीच सेंद्रिय म्हणून विक्री होण्याची शक्यता अधिक वाटते.
गुणवत्तेपेक्षा दरावर जोरतीन स्तरांमध्ये केलेल्या सर्र्वेक्षणात निच्चतम आर्थिक स्तरांतील नागरिकांविषयी अनोखी माहिती पुढं आली आहे. मंडईत गेल्यानंतर त्या दिवशीची सर्वाधिक स्वस्त भाजी घेण्याकडे कल असतो. कित्येकदा भाजी स्वस्त आहे, या कारणाने ते सलग तीन ते चार दिवस एकच भाजी खाणंही पसंत करतात.
सेंद्रिय शेती आणि त्यातील उत्पादने याविषयी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याची पाहणी केल्यानंतर बरीच धक्कादायक माहिती पुढं आली आहे. आरोग्याविषयी जागरूक असणा-या साता-यात अद्यापही सेंद्रिय उत्पादनांची म्हणावी इतकी माहिती सामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही.- प्रा. डॉ. सारंग भोला, विभाग प्रमुख,केबीपी मॅनेजमेंट कॉलेज, सातारा
नैसर्गिक बाज जपून आरोग्यदायी राहणं ही सातारकरांची खासियत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आरोग्याच्या बाबत सातारकर किंती संवेदनशील आहेत, याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले. यात विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरातील लोकांशी संवाद साधला. सेंद्रिय उत्पादने प्रकृतीसाठी उत्तम असूनही याची जागृती सामान्यांमध्ये नाही.- प्रिया जाधव, विद्यार्थी,केबीपी मॅनेजमेंट कॉलेज, सातारा