सातारा सोडू नका; माढा उमेदवार बदला; अजित पवारांसमोर नेते, कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका
By नितीन काळेल | Published: March 27, 2024 07:32 PM2024-03-27T19:32:18+5:302024-03-27T19:32:46+5:30
नितीन पाटील अन् संजीवराजेंच्या उमेदवारीची एकमुखी मागणी
सातारा : लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप आणि उमेदवारीवरुन महायुतीत वाद असून पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी सातारा मतदारसंघ दुसऱ्याला सोडू नका आणि माढा मतदारसंघातील उमेदवार बदला, अशी टोकाची भूमिका घेतली. त्याचबरोबर दोन्ही मतदारसंघातून नितीन पाटील आणि संजीवराजेंच्या उमेदवारीची एकमुखीही मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाबाबतचा महायुतीतील तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजप तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही मतदारसंघ आम्हालाच मिळणार असे दावे केले जात आहेत. तर माढा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीला सोलापूर जिल्ह्यातील भाजपमधील मोहिते-पाटील यांनी विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही तीव्र विरोध दर्शवलाय. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच घेण्याची सतत मागणी होत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर पुण्यात सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बैठक झाली. यामध्ये तीव्र भावना मांडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती शशिकांत पिसाळ, म्हसवडचे युवराज सूर्यवंशी, जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे, शशिकांत वाईकर यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकनंतर सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल माहिती घेतली. त्यावेळी सातारा जिल्हा महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा पक्षाचे बलस्थान आहे. या जिल्ह्यात पक्षाच्या घड्याळ चिन्हावरच लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच आगामी काळात विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्याला सामोर जाण्यासाठी पक्षाचा उमेदवार साताऱ्यातून उभा राहिलाच पाहिजे, अशी भूमिकाही घेण्यात आली. त्याचबरोबर सातारा मतदारसंघातून सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाबाबतही जोरदार स्पष्टीकरण देण्यात आले. माढ्याची महायुतीतील उमेदवारी बदलावी. दिलेल्या उमेदवाराबद्दल लोकांत रोष आहे. आम्ही सांगूनही कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. प्रचाराबद्दल आमचंही कोणी एेकणार नाहीत अशी स्थिती आहे. तसेच माढ्यात प्रचार करण्याची आमचीही मानसिकता नाही, असेही अजित पवार यांच्यासमोर स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर संजीवराजे यांनाच माढ्यातून उमेदवारी मिळावी, अशी सर्वांनीच मागणी केली. यामुळे सातारा आणि माढा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीचा अजित पवार गट आग्रही असल्याचेच दिसून आले आहे. तरीही यावर पवार यांनी स्पष्टपणे कोणतेही संकेत दिले नसल्याचीही माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची शेवटची बैठक होणार !
पुण्यातील बैठकीत सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची लोकसभा मतदारसंघ जागा वाटपाची शेवटची बैठक बुधवारी रात्रीच होणार असल्याचे या बैठकीतून समजले. त्यामुळे मुंबईतील बैठकीत काय ठरणार यावरच सातारा आणि माढ्याचा निर्णय अवलंबून असेल, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतून फोन आला की कोण एेकत नाही..
जिल्ह्यात तसेच तालुक्यातही आपण सक्षम आहोत. पण, मुंबईतून फोन आला की आमचे कोणीच एेकत नाही, अशी व्यथाही या बैठकीत अजित पवार यांच्यासमोर मांडण्यात आल्याची माहितीही मिळत आहे.