दत्ता यादव।सातारा : सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलातील सर्वोत्तम अन्वेषण अधिकारी, कायद्याची जान असणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जिल्ह्यातील अनेक गाजलेल्या खुनांचा त्यांनी तपास केला. त्यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आहेत. यासंदर्भात वसंत साबळे यांच्याशी केलेली बातचित.
प्रश्न : आपल्या कामाचे वेगळेपण नेमके काय आहे ?उत्तर : मला व माझ्या सहकाऱ्यांना अनेकवेळा गुन्हे तपासात अखंडित ३६ तासांपेक्षा जादा काम करावे लागले. चांगल्या कामाचे वरिष्ठांनी नेहमी कौतुक करून पाठीवर शाब्बासकीची थाप टाकल्याने कामातील आनंदही वाढत गेला. काम करत असताना प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी आणि उत्साहामुळे कधी थकवा किंवा नकारात्मकता जाणवत नाही.
प्रश्न : वाढ होणाºया गुन्ह्यांना प्रतिबंध कसा करता येईल?उत्तर : अलीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सुशिक्षीत तरुण बेरोजगार झाल्याने गुन्हेगारीकडे वळले आहेत. या लोकांकडून बँकिंगचे गुन्हे घडत आहेत. लोकांना वेगवेगळ्या भूलथापा मारून परस्पर अकाऊंटमधून पैसे काढले जात आहेत. यासाठी सतर्कता हाच एकमेव पर्याय आहे. आपल्या खात्याची माहिती अनोळखी व्यक्तीला द्यायला नाही पाहिजे.
प्रश्न : आरोपींना शिक्षा होण्यासाठी तुम्ही काय केले ?उत्तर : गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळापासून साक्षीदारांपर्यंत सर्व पुरावे गोळा केले. आरोपीला शिक्षा लागलीच पाहिजे, यासाठी कायद्याचा आणि पुराव्याचा अभ्यास केला. दोषारोपपत्र तयार करताना एकही त्रुटी पाठीमागे राहू नये, याची खबरदारी घेतली. पुन्हा-पुन्हा त्रुटीवर विचार करून न्यायालयात पुरावे सादर केले.
- कौतुकाची थाप प्रेरणा देते..
पोलीस दलात काम करत असताना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर काम करण्यास प्रचंड उत्साह आणि आणखीनच बळ मिळते. प्रामाणिकपणे काम केल्यास आपल्या स्वत:लाही आनंद मिळतो. गुन्ह्याच्या नाण्याला दोन बाजू असल्या तरी कायद्याची बाजू भक्कपणे मांडावी, यासाठी आमचे प्रयत्न असतात. यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्वातंत्र्य मोलाचे असते.
- व्यायामामुळे झाले सर्व शक्य..
वसंत साबळे हे अष्टपैलू आहेत. पोहणे, मॅरेथॉन, सायकलिंगही ते उष्कृष्टरीत्या करतात. रोज सकाळी ते धावण्याचा सराव करत असल्यामुळे दिवसभर त्यांना काम करताना उत्साह जाणवतो. आजचे काम आजच संपविण्याचा त्यांचा होरा असतो. त्यामुळे प्रलंबित काम त्यांच्याकडे राहत नाही. प्रत्येक गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून त्याचा तपास केला जातो. त्यामुळे भल्या भल्यांना कारागृहाची हवा खावी लागली आहे.
समाजातील प्रत्येकजण पोलीसच असतो. त्यांनीही आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. तरच घडणारे गुन्हे भविष्यात नक्कीच टळतील.- वसंत साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, कोरेगाव