लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. याबाबत सामान्यांमध्ये जागृती झाली असल्याने लसीकरणासाठी सध्या सर्वच ठिकाणी अक्षरश: झुंबड उडाली आहे. प्रत्येक वयोगट आम्हांलाच अग्रक्रमाने लस द्या, असे म्हणत आहे. अशा परिस्थितीत काही ६० तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी निर्धारित वेळेपेक्षा एक दोन आठवडे विलंब होत आहे. मात्र, असा विलंब होत असला तरीही नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध होईल, तेव्हा दुसरा डोस घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
लसीकरण घेतल्यानंतर कोरोनाला आळा बसल्याचे चित्र जगभरात पहायला मिळत आहे. भारतातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लस वापरून देशात लसीकरण सुरू आहे. त्यातही कधी ज्येष्ठांना प्राधान्य तर कधी दुसऱ्या डोसवाल्यांना प्राधान्य असे निकषदेखील बदलत आहेत. त्यात आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण देण्यास प्रारंभ झाल्याने लसीकरणाची समस्या अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागत आहे.
चौकट :
... तर कोरोनाची बाधा होऊ शकते
पहिली लस मिळालेल्या लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अनेकांना पहिला डोस मिळून महिना उलटत आला तरी दुसरा डोस मिळाला नाही. दुसऱ्या डोसला उशीर झाला तर त्याचा प्रकृतीवर काही परिणाम होईल का? काही अडचण येईल का? याबद्दल अनेक संभ्रम नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. मात्र, नागरिकांनी संभ्रमित होऊन दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर झुंबड करण्याची आवश्यकता नाही. झुंबड केल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ शकते, याचे भान ठेवावे, असे तज्ज्ञ सांगतात.
उपलब्ध लसीचा डोसच घ्यावा
पहिली लस घेताना नागरिकांनी जी उपलब्ध आहे, त्या लसीचा डोस घ्यावा. मात्र, पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी ४ ते ६ आठवडे आहे. त्यातही एखादा आठवडा पुढे मागे झाले तर चालू शकते. त्या कालावधीत दुसरा डोस घेतल्यास शरीरात अँटीबॉडीज तयार होऊन नागरिक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यास सक्षम बनू शकतील.
एक नजर लसीकरणावर
पहिला डोस आरोग्य सेवक ३०१५२
दुसरा डोस १८५४५
फ्रंटलाईन वर्कर्स पहिला डोस ३९१७४
दुसरा डोस १९२१८
ज्येष्ठ पहिला डोस २३८३६५
दुसरा डोस ३००४३
४६ ते ६० पहिला डोस २२२८९४
दुसरा डोस १५९४४