सातारा : मानधन नको, वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांनी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत सातारा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातून शेकडो परिचालक सहभागी झाले आहेत. तर या आंदोलकांनी दुपारच्या सुमारास अचानक रास्तारोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे पोलिसांनाही धावपळ करावी लागली.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यामध्ये शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत. तर याबाबत प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान मागण्यांबाबत आश्वासन दिल्याने उपोषण थांबवले होते. मात्र, या आश्वासनानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरूवात करण्यात येत आहे. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा. कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी आमच्या खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरूवात झाली. दुपारी साडेबारानंतर आंदोलक समोरील रस्त्यावर बसून आंदोलन करु लागले. यामुळे कोरेगाव बाजुला जाणारी वाहतूक खोळंबली. तसेच पोवई नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावरही आंदोलक बसू लागले. परिणामी दोन्ही मार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा केली. पण, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटण्यास ते तयार नव्हते. शेवटी कारवाईचा इशारा देताच आंदोलक पुन्हा उपोषणस्थळी जमा झाले. तर संगणक परिचालकांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत परिचालक आंदोलनस्थळीच होते.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यात; महिलांचा सहभाग अधिक
साताऱ्यातील संगणक परिचालकांचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केल्याचे आंदोलकांनी सांगितले. या उपोषणात अधिक करुन महिला संगणक परिचालकांचा समावेश असल्याचे दिसून आला. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार परिचालकांनी केला आहे.