कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेत विविध ठिकाणांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेटी दिल्या. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात जेवढा साठा आहे आणि त्याची ज्याठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी ते पोहोच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गरज असणाऱ्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मात्र, तरीही शासन ते उपलब्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. काही राज्यांमध्ये मुबलक साठा असला तरी त्यांनी ते बाहेर न देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही काहीजणांकडे इंजेक्शनचा साठा आहे. काही साठेबाजांवर सरकारने कारवाई केली असून, इतर साठेबाजांची माहिती संकलित केली जात आहे.
शासनाने घातलेल्या निर्बंधातून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळली आहेत. मात्र, अत्यावश्यक कारणाच्या नावाखाली कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची लाट गंभीर असून, प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
- चौकट
औद्योगिक ऑक्सिजन रुग्णांना द्या !
राज्य शासनाने औद्योगिक कारणासाठी दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. तो ऑक्सिजन रुग्णांसाठी देण्याचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्ह्यातही ज्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत आहे त्या सर्वांना ऑक्सिजन रुग्णांसाठी देण्याचे आदेश दिले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
- चौकट
केंद्राकडून राज्याला मदत अपेक्षित !
केंद्र सरकार रेमडेसिविर इंजेक्शनबाबत राज्याला सहकार्य करीत नाही. केंद्राकडे इंजेक्शनचा साठा आहे. मात्र, ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात केंद्राकडून राज्याला इंजेक्शन दिले जात नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्राने मदत करणे अपेक्षित आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
फोटो : १८केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडातील भाजी मंडईसह विविध ठिकाणांची सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.