आदर्की : नेत्यांचे वाढदिवस अन् पावसाळ्यात वृक्षारोपण करायचे छायाचित्रे काढणे, ते समाजमाध्यमातून पसरवले जातात. पण त्यानंतर संगोपन करायचे विसरून संबंधित रोपे पाण्यावाचून वाळून जातात. त्यामुळे केवळ झाडे लावण्याची नाटकं बंद करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वातावरणात बदल व पर्जन्यमान घटले आहे. प्रत्येक पाच, दहा वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शासनाचा वन विभाग, सामाजिक वनीकरणाच्या हजारो हेक्टरवर दरवर्षी जंगली वृक्षाची लागवड केली जाते. परंतु पर्जन्यमान कमी झाल्याने रोपे जागेवरच वाळून जाऊ लागल्याने शासनाने वनविभागातील वृक्षारोपणाला पाणी देण्यासाठी खर्च करण्यात मुभा दिली. पाच वर्षांपूर्वी शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट दिले, पण बहुतांशी ग्रामपंचायतींनी कागदोपत्री वृक्षलागवड केल्याने वृक्षगणना केल्यास सत्य बाहेर येईल.