लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे अंदाजपत्रक कमी आहे. त्यामुळे कोरोनाचे नाव घेऊन थांबणे योग्य नाही. कोरोना आहे, तर चहाचा खर्चही कमी करा. अभ्यासदौरेही नको, असे अनाठायी खर्चच कमी करा, अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्यांनी आपला उद्वेग स्पष्ट करत मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे २०२१-२२ चे ४१ कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात अर्थसंकल्पीय सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी २०२०-२१ चे सुधारित, तर २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास चार कोटींनी मूळ अंदाजपत्रक कमी आहे. कोरोनामुळे अंदाजपत्रक ४० कोटी ९९ लाखांचे, तर एक लाख शिलकीचे जाहीर करण्यात आले. अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर सभेपुढील विविध विषयांचे वाचन करण्यात आले. बहुतांशी विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
अंदाजपत्रक जाहीर केल्यानंतर सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी कोरोनाचे नाव घेऊन अंदाजपत्रक कमी झाले. पण, अभ्यास दौऱ्यावर पाच लाखांचा खर्च कशाला करायचा. कोरोनामुळे दौऱ्यावर जाणारा आहात का? हेच पैसे जिल्हा परिषदेच्या सेस निधीत वळवा. लोकांची कामे तरी होतील. सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, दौरे रद्द करा, असे सांगितले.
सदस्य अरुण गोरे यांनी अर्थसंकल्प हा कभी खुशी, कभी गमसारखा आहे. भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे कृषी विभागाला अधिक तरतूद करायला हवी होती. शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यात यावेत, असे मत व्यक्त केले. तर भीमराव पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीला जादा निधी देण्याची मागणी केली. सदस्य बापूराव जाधव यांनीही नको त्या गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च होतात. हेच पैसे आरोग्यासाठी खर्च व्हायला हवे होते, असे सांगितले.
कृष्णा सिंचन, सातारा आणि टेंभू सिंचन विभागाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपयांचे येणे असल्याचा मुद्दा सुरेंद्र गुदगेंनी समोर आणला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पाणीपट्टीची बाब गंभीर आहे. ग्रामपंचायतींच्या चुकांमुळे हे झाले आहे. याचा जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर परिणाम होतो. मार्चअखेर अधिकाधिक पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
कोट :
कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तरीही अंदाजपत्रकात सर्व विभागांना न्याय देणयाचा प्रयत्न झाला आहे. कृषी आणि पशुसंवर्धनसाठी चांगली तरतूद आहे. परिस्थिती सुधारली, तर सर्व विभागांसाठी आणखी तरतूद करू.
- उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद
चौकट
अंदाजपत्रकातील विभागनिहाय तरतूद अशी...
- सामान्य प्रशासन विभाग : २ कोटी ३७ लाख
- शिक्षण : ३ कोटी ८५ लाख
- बांधकाम : ११ कोटी २० लाख
- लघुपाटबंधारे : १ कोटी १० लाख
- आरोग्य : १ कोटी २० लाख
- कृषी : २ कोटी २५ लाख
-पशुसंवर्धन १ कोटी
-समाजकल्याण : ३ कोटी ५६ लाख
फोटो१७सातारा झेडपी नावाने...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी जाहीर केला. यावेळी विनय गौडा, प्रदीप विधाते, उदय कबुले, मंगेश धुमाळ, कल्पना खाडे, सोनाली पोळ उपस्थित होते. (छाया : जावेद खान)
.................................................................................