कोयनानगर (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात मंगळवारी सकाळी १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला.
धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे मंगळवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी एक फुटाने उघडले. दरवाजातून ८ हजार ५५२ व पायथा वीजनिर्मितीगृहातून २ हजार १०० असे एकूण १० हजार ६५२ क्यूसेस पाणी सोडण्यात आले.आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयनाचे जलपूजन करण्यात आले. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंत्या वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, अशोक पाटील, हरिष बॉमकर, धोंडीराम बोमकर, दिलीपराव संपकाळ आदींसह धरण व्यवस्थापन विभागातील अधिकारी उपस्थित होते.कोयना भाग व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सध्या कोयना जलाशयात एकूण पाणीसाठी १०१.१३ टीएमसी पाणी साठा झाला. धरणात २७ हजार ३७० क्सूसेक्स पाण्याची आवक आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : कोयनानगर ८०, नवजा ८६ तर महाबळेश्वर येथे ९०.आवश्यकतेनुसार दुपारी बारा वाजल्यानंतर विसर्गात ८ हजार क्यूसेसने वाढ करून एकूण १८ हजार ६०० क्यूसेस करण्यात येईल, अशी माहिती कोयना धरण सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.