सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे रविवारी दुपारी बारापासून सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यामुळे सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २८,३२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात ८४.२४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर दुसरीकडे कण्हेर धरणाचेही चार दरवाजे ०.३० मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या २१ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना, कण्हेर, तारळी यासह मोठ्या धरणांत पाण्याची मोठी आवक होत आहे. कोयना धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने शनिवारी धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. तर रविवारी दुपारी बाराला दरवाजे सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले असून, त्यातून २६,२२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दरवाजातून विसर्ग वाढल्याने कोयना नदीची पाणीपातळी वाढणार आहे.
जिल्ह्यातील इतर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये रविवारी सकाळी ८.५८ टीएमसी साठा असून सकाळी दहा वाजता धरणाचे चार दरवाजे ०.३० मीटरने उचलण्यात आले आहेत. त्यामधून २९७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात ३३६१ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणातही ३.५१ टीएमसी पाणीसाठा असून, ११६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे. तारळीतील साठा ५.१२ टीएमसी असून २७८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०३ ४७६
कोयना ६९ ३२०७
बलकवडी ३८ १७२८
कण्हेर ०६ ५६२
उरमोडी १७ ८३४
तारळी ३८ १५३१