पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगरपठारावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत कित्येक मैलांची पायपीट करत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.डोंगर भागात पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील दहा ते पंधरा कुटुंबे असणाऱ्या आखाडे वस्तीतील ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु त्यातील पाणी कमी चालल्याने डोंगरातील झऱ्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे. डोंगरदऱ्यातून पाणी भरावे लागत असल्याने छोट्या भांड्यांचा वापर केला जात आहे. झाडाझुडपातून मार्ग काढत लहान मुले, महिला पाणी मिळविण्यासाठी धडपड करत असताना पाहावयास मिळत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अजून दहा दिवसांचा कालावधी आहे. तोही वेळेत पडला तर ठिक नाहीतर पठारावरील अनके गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. दिवसभर पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागते. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना पाणी भरण्याच्या कामासाठी जुंपले जात आहे. दिवसभर लहान मुले भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून बसत आहेत. हा झरा लोकवस्तीपासून काही मैल अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हाचा सामना करत डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर पठारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही. सध्या डोंगर पठारावरील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)उन्हाने झरेही लागले आटूउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटू लागले आहेत. डोंगरावर मैलोन्मैल पायपीट करून झऱ्याचे पाणी डोक्यावरून आणले जात आहे. लहान मुले, महिला यांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. सध्या उन्हामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस वेळेत पडला नाही तर तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे वस्ती...सुटीत मुलांना पाणी भरण्याचे कामशाळांना सुटी लागली असली तरी डोंगर पठारावरील अनेक गावांमधील मुलांना सुटीचा आनंद घेता येत नाही. कुटुंबाची तहान भागविण्यासाठी त्यांनाही पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.जनावरांचेही हालडोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
डोईवर हंडे... पायाला चटके!
By admin | Published: May 25, 2015 10:34 PM