सातारा : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळू लागला आहे. सातारा बाजार समितीतही भाव टिकून आहे. गुरुवारी तर मागील काही महिन्यांचा विचार करता दुपटीने आवक झाली. ३४९ क्विंटलची नोंद झाली तर १ हजारापासून ३२०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात शेतीमाल येतो. तर दर गुरुवार आणि रविवारी मालाची अधिक आवक होते. यामध्ये कांदा, बटाट्याची आवक जादा राहते.
मागील अडीच महिन्यांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडेसहा हजारांपर्यंत पोहोचला होता. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळूहळू कमी झाला. बाजार समितीतही दर ढासळला. मात्र, मागील महिन्यात केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर दरात थोडी सुधारणा झाली. सातारा बाजार समितीत १ हजारापासून ३२००, ३४०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे. गुरुवारी बाजार समितीत कांद्याची ३४९ क्विंटलची आवक झाली. मागील सहा महिन्यांतील ही उच्चांकी आवक ठरली. तर दर १ हजारापासून ३२०० रुपयांपर्यंत आला. त्यामुळे दर टिकून असल्याचे दिसून आले.
बाजार समितीत ५७ वाहनांतून ९९६ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर अद्यापही अनेक भाज्यांना दर मिळत नसल्याचे समोर आले. गुरुवारी गवार आणि शेवग्याचा दर तेजीत निघाला. गवारला १० किलोस ३०० ते ४५० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ४०० ते ५०० रुपये भाव आला. वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटो ३० ते ५०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ४० ते ६० अन् दोडक्याला १५० ते २०० रुपये दर आला.
बटाट्याला क्विंटलला ८०० पासून दोन हजारांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार ते १८०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला तीन ते सात हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. दीड हजार ते २२०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
पालेभाज्यांच्या दरात सुधारणा...
सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. त्यातच मागील काही दिवसांच्या तुलनेत दरात थोडीशी वाढ झाली आहे. गुरुवारी मेथीच्या १२०० पेंडींची आवक झाली. याला शेकडा ७०० ते ८०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १५०० पेंडी आली. याला शेकडा दर ५०० ते ६०० रुपये मिळाला.
......................................................