सातारा : पावसाच्या आगमनापूर्वी शाहूपुरी परिसरातील विद्युत खांब, रोहित्रांसह डीपी बॉक्सचे नादुरुस्त दरवाजे दुरुस्ती करण्याचे काम वीज वितरण कंपनीने हाती घेतले आहे. पावसापूर्वी हे काम संपविण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीने ठेवले आहे.
शाहूपुरी परिसरातील विजेच्या संबंधित असलेल्या विविध त्रुटी लक्षात घेऊन, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने व करंजे वीज वितरण कार्यालयाचे विभागीय अभियंता शीतल डोळे यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी त्यांच्याशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होऊन निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार त्या- त्या वेळेत प्रत्येक काम मार्गी लागत असून, सद्य:स्थितीत परिसरातील जे नादुरुस्त डीपी होते, ते दुरुस्त करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
याअंतर्गत समर्थनगर व जैन मंदिर रोहित्राच्या वितरण पेटी बदलल्या, तसेच स्वरूप कॉलनी व पवार कॉलनी, रांगोळे कॉलनी येथील डीपीचे दरवाजे बसविले आहेत. करंजे वितरणचे दोन बॉक्स बदलले असून, निवेदनातील इतर कामेही प्रगतिपथावर आहेत. वीज वितरण विभागाने या सर्व तक्रारींची नोंद घेऊन प्रत्यक्ष कृतीतून ठरलेल्या नियोजनानुसार कामाचा निपटारा करण्याच्या भूमिकेचे शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे, तसेच आघाडी परिवारातील सर्व सहकारी सदस्यांसह संपूर्ण शाहूपुरीवासीयांनी कौतुक केले.