प्रमोद सुकरे, कराड: सातारा जिल्ह्यात सध्या भाजपनेही चांगलाच जोर लावला आहे. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून कराडच्या डॉ.अतुल भोसले यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी मतदार संघात जोरदार काम सुरू केले आहे. आता तेच लोकसभेला उमेदवार असतील असे तर्क वितर्क लावले जात असतानाच नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराड दौरा झाला. त्यात त्यांनी या सर्व तर्क वितर्कांना पूर्णविराम देत दक्षिणच्या रणांगणात भाजपच्या वतीने पुन्हा डॉ. अतुल भोसलेच असतील असे संकेत दिले. त्यामुळे दक्षिणेतील भाजप चांगलीच चार्ज झालेली दिसत आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो .मात्र कराड दक्षिणवर आजवर काँग्रेसचीच पकड कायम राहिली आहे. या जिल्ह्यात भाजप बळकट होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच त्यांनी आता सुरुवातीला लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे.अन त्याची जबाबदारी भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांच्यावर टाकली आहे.
दुसरा तगडा उमेदवारच दिसत नाही
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या उमेदवारीवर दोन वेळा लढत दिली. पण ते यशापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पण त्यांनी लढत ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज उमेदवाराबरोबर दिली ही बाब ही महत्त्वाची आहे .सध्या तरी कराड दक्षिणेत डाँ. भोसलेंसारखा दुसरा तगडा उमेदवार भाजपकडे दिसत नाही.
खासदार उदयनराजेंचाही दुजोरा
कराडच्या जाहीर सभेत खासदार उदयनराजे भोसले यांचेही भाषण झाले. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी डॉ. अतुल भोसले यांचा उल्लेख करताना भावी आमदार असा केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
जयकुमार गोरें कडूनही कौतुक
सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनीही आपल्या भाषणात डॉ.अतुल भोसले यांचे तोंड भरून कौतुक केले. पक्ष देईल ती जबाबदारी अतुल भोसले समर्थपणे पेलत आहेत. म्हणून तर मला त्यांना आमदार झालेलं बघायचं आहे. सगळी भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्यात जोश भरला.
भोसलेंनी केले फडणवीसांचे सारथ्य
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ.अतुल भोसले यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळेच फडणवीस आदल्या दिवशीच डॉ.अतुल भोसले यांच्या उद्योग समूहावर मुक्कामाला होते. सकाळी त्यांना घेऊन जाताना त्या गाडीचे सारथ्य डॉ.अतुल भोसले यांनी केले होते. त्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी डॉ. भोसलेंना पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले होते.
आम्ही तर तुमचे भक्त..
डॉ. अतुल भोसले यांनी तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही तुमचे भक्त आहोत असे सांगितले. तुम्ही आम्हाला नेहमीच भरभरून दिले आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा कराड दक्षिणमधून भरभरून देऊ .सातारा लोकसभा निवडणुकीत आम्ही मागे असणार नाही. असा शब्द देत खासदार भाजपचाच असेल असेही त्यांनी सांगितले.