वाई : विविध संस्थांचे अध्वर्यू, प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाबरोबरच मराठेशाहीच्या इतिहासाचे भाष्यकार, व्यासंगी लेखक, ज्येष्ठ इतिहासकार आणि वाईतील मराठी विश्वकोशाच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार, विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे (वय ८२) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.डॉ. सु. र. ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कागल येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे घेतल्यानंतर ‘यादव शिल्पशैली’ या प्रबंधावर त्यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथून पीएचडी मिळविली. त्यानंतर १९५९-६४ पर्यंत शिक्षक, प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोशात नोकरीस सुरुवात केली आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली. १९६४ ते २०१८ म्हणजे अगदी अखेरपर्यंत ५४ वर्षे त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला वाहून घेतले. मराठी विश्वकोशाच्या १ ते २० खंडांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सहसंपादक, विभाग संपादक ही पदे सांभाळली. प्रसिद्धीपासून दूर राहून या इतिहासकाराने भारतीय प्राचीन, मध्ययुगीन व मराठेशाही यांची जी मांडणी केली ती इतिहासप्रेमींसह सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. त्यांनी लिहिलेले ‘मराठेशाहीतील मनस्विनी’ हे पुस्तक म्हणजे मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे सोनेरी पान ठरले.त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, मुलगी वैशाली, मुलगा विक्रम आणि हृषीकेश, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. सु. र. देशपांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:51 AM