वडगाव हवेली : गतवर्षापासून सर्वत्र कोरोनाच्या भयावह संकटाचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुन्हा कऱ्हाड तालुक्यातील कृष्णाकाठावरील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिणामी, गावागावात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
कऱ्हाड तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. मास्क वापरण्याचे गांभीर्यही कमी झाले आहे. कृष्णाकाठावरील कार्वे, गोळेश्वर, कापिल, कोरेगाव, कोडोली, दुशेरे, शेरे, वडगाव हवेली, शेणोली, जुळेवाडी, गोंदी, खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द ही गावे दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झाली होती; पण दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा या गावांमध्ये कोरोना रुग्णांचा शिरकाव सुरू झाला आहे.
आठ गावांमधील लोकसंख्या आणि कोरोनाची सध्याची आकडेवारी पाहता भविष्यातील धोका वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी ग्रामीण भागात या संचारबंदीला जनता फारसे गांभीर्याने घेत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे शहरी भागात वाढणारा कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
- चौकट
चौदा गावांमध्ये चाळीस रुग्ण
जुळेवाडी : ११
रेठरे बु. : १
रेठरे खु. : १
शेरे : ८
कोडोली : १
वडगाव हवेली : ३
कार्वे : ७
गोळेश्वर : ८
- चौकट
कोरोना समितीने सतर्क राहण्याची गरज
गतवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून गावामध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. ज्यामुळे गावांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही. कोरोना समितीने पुन्हा सतर्क राहण्याची गरज आहे.
- चौकट
ग्रामस्थांच्या बेफिकिरीचा गावाला त्रास
लग्नसराई, यात्रा व अन्य कार्यक्रम मोजक्याच लोकांमध्ये करण्याबाबत शासनाने सूचित केले आहे. मात्र, तरीही या कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत. विनामास्क, सोशल डिस्टन्स न पाळता अनेकजण कार्यक्रमांमध्ये वावरत आहेत. या वागण्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्याची शिक्षा संपूर्ण गावाला भोगावी लागणार आहे.