सातारा : नव वर्षात ‘मिशन पाणी’ हा संकल्प पूर्णत्वास आणण्याचा निर्धार प्रशासनाने केला असून, त्या दृष्टीने ठोस पावलेदेखील उचलली आहेत. कास धरण, कण्हेर उद्भव योजना, बोंडारवाडी धरण, जिहे-कठापूर, टेंभू अशा प्रमुख योजनांची कामे गतिमान झाली असून, जिल्हावासीयांचे मुबलक पाण्याचे स्वप्नही आता लवकरच पूर्ण होणार आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आले आहे. धरणाचे मातीकाम ९५ टक्के, तर एकूण ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. काम शंभर टक्के झाल्यानंतर आज उपलब्ध असणाऱ्या १०७ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेमध्ये पाचपट वाढ होणार असून, ती सुमारे ५०० दशलक्ष घनफूट इतकी वाढणार आहे. नवीन वर्षात हे काम मार्गी लावण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे. निधीअभावी या कामाला ब्रेक मिळाला हाेता. मात्र हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या कामासाठी राज्य शासनाने नुकताच ५७ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर केला असून, धरणाच्या नवीन सांडव्याचे काम सुरू झाले आहे.
बहुचर्चित कण्हेर उद्भव योजना मार्गी लागण्याच्या हालचालीही आता गतिमान झाल्या आहेत. शाहूपुरी वासीयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी शाहूपुरी पाणी योजना २०१५ रोजी सुरू झाली. कण्हेर धरणातून पाणी उचलून ते शाहूपुरीपर्यंत पाईपलाईनद्वारे आणले जाणार आहे.
या योजनेसाठी प्रारंभी ३३ कोटींचा निधी मंजूर झाला; परंतु गेल्या पाच वर्षांत या योजनेचे काम म्हणावे त्या गतीने झाले नाही. या योजनेच्याअंतर्गत पाईपलाईनचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. शासनाकडून या योजनेस वाढीव निधी मंजूर झाला असून, पाईपलाईनचे काम पूर्ण होताच नागरिकांना नवीन नळकनेक्शन दिली जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
(चौकट)
जमीन ओलिताखाली
- बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लागताच मेढा, केळघर भागातील ५४ गावांना पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.
- दुष्काळी माण, खटाव तालुक्यांना वरदायिनी ठरणारी कृष्णा नदीवरील जिहे-कठापूर योजना अंतिम टप्प्यात आहे.
- या योजनेमुळे येरळा, माणगंगा या नद्या बारमाही वाहणार असून, २७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.