सातारा : देशातील अनेक मंदिरे, गुरूद्वार, चर्च, मशिदच्या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपणे महत्वाचे असल्याने सातारा जिल्ह्यातीलही ३२ मंदिरात भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतलेला आहे. तर महाराष्ट्रात ४५७ मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.सातारा येथील समऱ्थ सदनमध्ये आयोजित पत्रकार परिषेत घनवट बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हा निमंत्रक शिवाजीराव तुपे, अॅड. दत्तात्रय कुलकर्णी, गजानन भोसले, अॅड. दत्तात्रय सणस, रुपा महाडिक, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
सुनील घनवट म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नाही तर देशातील अनेक मंदिरे तसेच प्राऱ्थनास्थळे, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, पोलिस प्रशासन आदी ठिकाणीही वस्त्रसंहिता लागू आहे. याच धर्तीवर मंदिराचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील ३२ मंदिरांच्या विश्वस्तांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावीत याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे, असे सांगून धनवट पुढे म्हणाले, गेल्यावर्षी ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यासमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महासंघाचे कार्य वाढतच गेले. सध्या हे कार्य संपूर्ण राज्यात पोहोचले आहे. सध्या देशात उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृणेश्वर मंदिर, वाराणसीचे काशी-विश्वेवर, आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी, केरळातील प्रसिध्द श्री पद्मनाभस्वामी, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर, ओडिसातील जगन्नाथ मंदिर अशा मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्विक वस्त्रसंहिता लागू आहे.
वस्त्रसंहिता लागू सातारा जिल्ह्यातील मंदिरे..सातारा शहर :श्री दुर्गामाता मंदिर पंचपाळी हाैद राजवाडा, श्री बहुलेश्वर मंदिर व्यंकटपुरा, श्री कृष्णेश्वर मंदिर, श्री अजिंक्य गणेश मंदिर राजवाडा, श्री महाकालिका मंदिर देवी चाैक, श्री शनि मंदिर ५०१ पाटी, श्री प्रताप मारुती मंदिर प्रतापगंज पेठ, भैरवनाथ मंदिर करंजे, श्री कोटेश्वर मंदिर शुक्रवार पेठ, श्री मारुती मंदिर मेघदूत काॅलनी, श्री गणेश मंदिर आशीर्वाद काॅलनी संभाजीनगर आणि श्री विसावा मारुती मंदिर.
वाई तालुकाश्री भद्रेश्वर शिव मंदिर. तर भुईंज येथील श्री महालक्ष्मी, श्री मारुती, श्री खंडोबा, श्री महादेव, महर्षी भृगू ऋषी समाधी मंदिर, श्री एकविरा माता, श्री भवानीमाता आणि श्री राम मंदिर तसेच जांब येथील श्री चिलाई देवी व श्री भैरवनाथ मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
सातारा तालुकाश्री चाैंडेश्वरी माता मंदिर नागठाणे आणि श्री यवतेश्वर महादेव मंदिर.
कऱ्हाड तालुकाश्री भैरवनाथ मंदिर मसूर. कऱ्हाड शहरातील श्री अंबामाता मंदिर, श्री हनुमान, श्री विठ्ठल, श्री राम आणि समऱ्थ स्थापित हनुमान मंदिर यांचा समावेश आहे.
खटाव तालुका श्री नाथ मंदिर
अशी असेल वस्त्रसंहिता..
- तोकडे कपडे घालून मंदिरात जाता येणार नाही
- मंदिरात फाटकी जीन्स वापरता येणार नाही
- अश्लील अन् अंग प्रदर्शन करणारी कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश नसेल