मायणी : ‘मायणी - कातरखटाव राज्यमार्ग बनला धोकादायक’ खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ, असे वृत्त ‘लोकमत’मधून शनिवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने खचलेल्या मार्गावर मलमपट्टी केली.
मायणी - कातरखटाव राज्य मार्गावर मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर राज्यमार्ग पूर्ण खचला आहे. या ठिकाणी वारंवार लहान - मोठे अपघात होत आहेत. शुक्रवारी याठिकाणी ऊस वाहतूक करणारी ट्राॅली पलटी झाली होती. रात्रीच्या वेळीही ट्रॅक्टर पलटी झाल्याने काही काळासाठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, तर संबंधित ट्रॅक्टर चालकाला रात्र जागून काढावी लागली होती. तसेच शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत ‘लोकमत’ने या पलटी झालेल्या ऊसट्राॅलीचे फोटोसह वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच मायणी - कातरखटाव सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तुपेवाडी, कातरखटाव पूल व मायणीपासून तीन किलोमीटर धोंडेवाडी गावाच्या हद्दीत रस्ता खचला आहे. तसेच राज्य मार्गावर विविध ठिकाणी शेकडो खड्डे पडले आहेत.
याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, दिनांक ९ जानेवारीच्या अंकामध्ये वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी गावाच्या हद्दीनजीक खचलेल्या सुमारे ५० मीटर अंतरामध्ये खडीकरण करून हा मार्ग वाहतुकीसाठी योग्य केला.
मायणी, कातरखटाव, दहीवडी हा मार्ग केंद्राकडे वर्ग केला असून, याठिकाणी नॅशनल हायवे होणार असल्याचे बोलले जात असले तरी या मार्गावर सतत मलमपट्टी करण्याऐवजी चांगल्या दर्जाचे काम करावे तसेच मंजूर असलेल्या मार्गाचे काम लवकर चालू करावे, अशी मागणी स्थानिक प्रवासी व वाहनचालक करत आहेत.
फोटो : ११मायणी
मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी गावाच्या हद्दीनजीक खचलेल्या मार्गावर खडीकरण करण्यात आले. (छाया : संदीप कुंभार)