लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात रेंगडी हद्दीतील काळ्या कडाजवळ रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे ठप्प झाली. पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असून, रस्त्यातील दरड हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक तातडीने कामाला लागले आहे.मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भूस्खलन व दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडत आहेत. २८ जून रोजीही दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे रस्ता बंद झाला. यावेळी वाहतूक कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. या घटनेची माहिती कळताच जावळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जे. डी. कर्वे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी व क्रेनच्या साह्याने रस्त्यावरील दरड बाजूला करून सायंकाळी सातच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, केळघर, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने केळघर घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
केळघर घाटात दरड कोसळली
By admin | Published: July 16, 2017 11:59 PM