सातारा : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी थांबल्यावर उतर म्हटल्याने चालकाला मारहाण करुन वाहकालाही शिवीगाळ करण्यात आली. यामुळे एसटीची फेरीच रद्द करण्यात आल्याने महामंडळाचे नुकसान झाले. याप्रकरणी खटाव तालुक्यातील एकाच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सतीश साहेबराव माळवे (रा. पुसेसावळी, ता. खटाव) या चालकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार महेश संजय कोरे (रा. चितळी, ता. खटाव) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. ११ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील फलाट क्रमांक आठवर हा प्रकार घडला.
चालक माळवे हे एसटी (एमएच, ०७. सी, ९५६७) सातारा येथून घेऊन पुसेसावळीला चालले होते. त्यावेळी बसमध्ये संशियत बसला होता. एसटी मागे घेत असताना ती थांबविता येत नव्हती. त्यामुळे चालकाने एसटी थांबल्यावर उतर असे म्हटले. यावरुन महेश कोरे याने केबीनच्या दरवाजातून आत जात चालक माळवे यांना मारहाण करुन शिवीगाळ केली.
तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. तर चालकाचे सहकारी वाहक दत्तात्रय गुरव यांनाही शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे एसटीची संबंधित फेरीच रद्द करण्यात आली. परिणामी राज्य परिवहन महामंडळाचे आऱ्थिक नुकसान झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे तपास करीत आहेत.