सातारा : कोरेगाव-स्वारगेट एसटी नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी दीडला मार्गस्थ झाली. साता-याचा थांबा घेऊन ती पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यात प्रवेश करताच खेड शिवापूरजवळ चालकाचा रक्तदाब वाढला. अचानक घाम फुटून अस्वस्थ वाटू लागल्याने प्रसंगावधानता राखत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहक अन् प्रवाशांनीही चालकाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराची कोरेगाव-सातारा-स्वारगेट (एमएच १४ बीटी ३७८४) एसटी घेऊन चालक शिलवंत व वाहक एम. के. वळकुंदे दुपारी दीडला साताºयाकडे मार्गस्थ झाले. साताºयात काही काळ विश्रांती घेऊन ते पुण्याकडे रवाना झाले. त्यावेळी गाडी ४४ प्रवासी होते. त्यांची गाडी सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडून पुणे जिल्ह्यात गेली. खेड शिवापूरजवळ येत असतानाच चालक शिलवंत यांना अस्वस्थ वाटू लागले. दरदरून घाम फुटला. त्यातून त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला; पण काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे जाणवल्याने त्यांनी गाडी महामार्गाच्या कडेला घेतली. आपणास अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांनी वालक वळकुंदे यांना सांगितले. एसटीतील प्रवासी अन् वाहकाने प्रसंगावधान राखत त्यांना एसटीतून खाली उतरवले. त्याचवेळी पोलिसांची गाडी तेथून निघाली होती. त्यांनी ती गाडी थांबवून चालकाला अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. पोलिसांनीही माणुसकी दाखवत शिलवंत यांना त्यांच्या वाहनातून जवळच्या रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. त्यानंतर सर्व प्रवाशांना पर्यायी एसटीतून पुण्याला हलविले. त्यानंतर कोरेगाव आगारातून गेलेल्या दुसºया चालकाने संबंधित गाडी परत आणली. चौकट : मुलगा रवाना शिलवंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वाहकाने कोरेगाव आगारात दिली. याची माहिती गोंदवले येथे त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांचा मुलगा दवाखान्यात गेला आहे. शिलवंत हे तीन महिन्यांपूर्वी चिपळूण आगारातून कोरेगावला बदलून आले आहेत.