शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बेशिस्त वाहनचालकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. यामुळे वाहनचालक आणि व्यापारी यांच्यात खटके उडत आहेत. तसेच नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.शिरवळ हे औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेले आहे. त्यामुळे याठिकाणच्या बाजारपेठेला महत्त्व आहे. वाहनांची संख्याही येथे मोठी आहे. रस्ते रुंद असले तरी वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही मुश्किल होते.वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला पोलीस प्रशासनाने लगाम घालण्याची गरज असून वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी व्यापारी वर्ग व नागरिकांमधून होत आहे. शिरवळमधून महामार्ग जात असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीच आहे. पण तरीही योग्य ते उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)पार्किंगच्या ठरावाचे काय झाले? बसस्थानक, शिवाजी चौक, मच्छी मार्केट, शासकीय विश्रामगृह, स्टेट बँक, प्राथमिक शाळा तसेच तालीम चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. यासंदर्भात शिरवळ ग्रामसभेत चर्चा होऊन सम-विषम पार्किंग करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकली नाही.
वाहनांची कोंडी अन् पादचाऱ्यांची गोची
By admin | Published: October 25, 2014 11:52 PM