पेट्री : शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना वादळी वाऱ्याच्या प्रचंड वेगाला सामोरे जाताना निसर्गापुढे मनुष्यबळ दुर्बळ पडू लागल्याने दैना उडताना दिसत आहे. तसेच कास पठारावर प्रेमीयुगुल पुन्हा आपापल्या वाहनांचा मोर्चा साताऱ्याकडे वळविताना दिसू लागले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून वादळी वारा सुरू असल्याने वाहनचालकांना आपली दुचाकी वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गणेशखिंड, अनावळे तसेच आटाळी परिसरातील पठार व कास पठारावर वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने वाहने रस्ता सोडून जमिनीवर येऊन घसरून पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बहुतांशी छोटे अपघात होऊन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच वाऱ्याला सामोरे जाताना रस्त्याच्या मधोमध वाहन येत असताना दाट धुक्याने मागील वाहनांचादेखील अंदाज येत नाही तसेच वाऱ्याच्या वेगाने दुचाकी वाहने रस्त्याच्या मधोमध अचानक बंद पडू लागल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कित्येक दुचाकी वाहनचालक निसर्गापुढे हार मानून पुन्हा माघारी फिरू लागले आहेत. तसेच ठिकठिकाणी झाडे उन्मळून तसेच झाडांचा पालापाचोळा रस्त्याच्या दुतर्फा पडून पावसाने कुजू लागला आहे. महाविद्यालयीन तरुण व दुचाकी वाहनचालकांची या वादळी वाऱ्यासमोर भंबेरी उडू लागली आहे. त्यामुळे या परिसरात फिरायचा आनंद लुटता येत नसल्याने तरुणाई, पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)वादळी वाऱ्याच्या वेगासमोर दुचाकी वाहनावरील वाहनचालकांचे हेलमेट उडून जाऊ लागले आहेत. तसेच वाहनावर एकटे बसून वजन वाऱ्यासमोर हलके होत असल्याने वाहने वाऱ्याच्या वेगाने रस्ता सोडून जाऊ लागल्याने कित्येक तरुणाई ट्रीपल सीट बसून जाण्याची नामी शक्कल लढविली. काही तरुण रस्त्याशेजारी आपली वाहने लावून स्वत:बरोबर वाहनांना आधार देतआहेत. एका हाताने हेलमेट, समोरून पावसाचा तोंडावर मारा बसून मान दुसरीकडे वळवून दुसऱ्या हातात वाहनाचे हँडल, असा जीव मुठीत धरून प्रवास करण्यापेक्षा रस्त्याशेजारी वाहने लावणे हेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच गाडीचा वेगही कमी असणे आवश्यक आहे.- बाळासो काळे, वाहनचालक, सातारा
वादळी वाऱ्यासमोर वाहनचालकांची उडतेय दैना
By admin | Published: June 26, 2015 10:59 PM