सातारा : जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होत असून आतापर्यंत फक्त ५८ टक्केच पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर माण, खटाव, फलटण आणि कोरेगावमध्ये दाहकता अधिक असून ४० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात शेती क्षेत्र अधिक आहे. खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख तर रब्बीतील २ लाख हेक्टर असते. ही शेती संपूर्ण पावसावर अवलंबून असते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसावरच पिके आणि धरणसाठा अवलंबून राहतो. यंदा मात्र, जिल्ह्यात दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. कारण, जिल्ह्यात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झालेले आहे. तसेच धरणेही भरलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.
जिल्ह्यात ११ तालुके आहेत. या सर्व तालुक्यात आतापर्यंत १०० टक्केही पाऊस झालेला नाही. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८१२ मिलीमीटर पर्जन्यमान होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात ४७२ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडलेला आहे. अजून पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक असलेतरी वार्षिक सरासरी पाऊस गाठणार का याविषयीही साशंकता आहे. त्यातच पावसाचे सर्वत्र प्रमाण कमी आहे.
मागीलवर्षी तब्बल १११ टक्के पाऊस...जिल्ह्यात मागील तीन वर्षे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात १६ सप्टेंबरपर्यंत १११ टक्के पाऊस झाला होता. तर यंदा ५८ टक्केच पडलेला आहे. तर गतवर्षी आतापर्यंत सातारा तालुक्यात १३५ टक्के पाऊस झाला होता. तर जावळीत १२७ टक्के, पाटणला ८६, कऱ्हाड तालुका ११३, कोरेगाव १०५, खटाव १३० टक्के, माण १२५, फलटणला १५९, खंडाळा तालुका १५४, वाई १२८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ७० टक्के पाऊस पडला होता.