वाठार स्टेशन, 2 : पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा असा नामोल्लेख केला जात असलेल्या कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भाग यंदाही अपुºया पावसामुळे अडचणीत सापडला होता. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असताना या भागातील दुष्काळ मात्र हटत नव्हता. या भागची वरदायनी असलेली वसना नदीही गेल्या अनेक वर्षांपासूून वाहिली नसल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी वसना नदी वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.
वसना नदी पुनर्भरण आराखडा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या आराखडा निश्चित करत जलसंधारण मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे वसना नदी पुनर्भरणाबाबत चा अहवाल सादर केला. त्यानंतर वसना नदीपात्रातील सोळशी ते पळशी या दरम्यान वसना नदीत २७ बंधाºयांना मंजुरी देण्यात आली. यासाठी १२ कोटी १५ लाखांच्या खर्चासही मान्यता मिळाली. या प्रमाणे वसना नदीपात्रात आजअखेर जवळपास २५ बंधारे पुर्णत्वास आले.
गेल्यावर्षी यातील काही बंधाºयात पाणीसाठा झाला होता. मात्र, हे पाणी काही दिवसातच आटुन गेल्यामुळे या भागाची दुष्काळी परस्थिती कायम राहिली.एका बाजुने या भागात पाणीसाठा होण्यासाठी जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसाअभावी बंधारे, ओढे कोरडे पडले होते.
पावसाळा संपत आला तरी या भागातील सर्वच पाझर तलाव, नदी पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने वसना नदीसह लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहु लगले आहेत.
नदीपात्रात सोळशी पासून पळशी पर्यंत असलेले सर्व केटी वेअर बंधारे ही ओसंडुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी परिसरातील बहुतांशी गावांचा तात्पुरता का होईना पाणी प्रश्न मिटला आहे.जलयुक्त शिवार ही लोकचळवळ बनू लागली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी हे आभियान वरदान ठरले आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे भुजल पातळी वाढणार असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.- मनोज अनपट,अनपटवडी