सागर गुजर।सातारा : माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांतील शेती जहे-कटापूर योजनेमुळे सिंचनाखाली येणार आहे. मार्च २०२० पर्यंत एका जलवाहिनेचे काम पूर्ण करून नेर तलावात पाणी सोडले जाणार आहे. या धरणातून येरळा नदी उन्हाळ्यातही वाहती ठेवण्यात यश येईल. या योजनेमुळे दुष्काळी भागातील शेतकरी निश्चितपणे नगदी पिके घेऊ शकणार आहेत.
- प्रश्न : जिहे-कटापूर योजनेचे स्वरूप कसे आहे?
उत्तर : जिहे-कटापूर ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी अशी योजना आहे. सातारा तालुक्यात कृष्णा नदीतून हे पाणी उचलून ते तब्बल १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तलावात सोडण्यात येणार आहे. नेर नदीतून हे पाणी येरळा नदीत सोडले जाणार असून, पुढे आंधळी धरणातही पाणी सोडून माणगंगा नदी वाहती ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागातील पाणी पातळीत निश्चितपणे वाढ होईल.
- प्रश्न : या योजनेचे लाभक्षेत्र किती आहे?
उत्तर : खटाव तालुक्यातील ४७ गावे आणि माण तालुक्यातील २० गावांतील सुमारे २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर तर माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
- प्रश्न : किती केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहेत?
उत्तर : येरळा नदीवर १५ केटीवेअर आणि माणगंगा नदीवर १७ केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एका केटीवेअरचे काम सुरू असून, उर्वरित ३१ केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये चांगला पाऊस झाला. या पावसामुळे दोन्ही नद्यांवरील केटीवेअर बंधारे पाण्याने भरले आहेत. साहजिकच झिरपलेल्या पाण्यामुळे फायदा होईल.
अशी आहे जिहे-कटापूर योजनाकृष्णा नदीवर सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर या गावाजवळ पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. जिहे, एकसळ, गोळेवाडी या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये पाणी उचलून हे पाणी खटाव तालुक्यातील नेर तलावात सोडण्यात येईल. तिथून हे पाणी येरळा नदीत सोडले जाईल. या नदीतून केटी बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी पाणी अडवण्यात येणार आहे. तर तिथून पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेले जाणार आहे. हा तलाव भरून ते पाणी माणगंगा नदीत सोडले जाणार आहे. या नदीवरही केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत.नैसर्गिक उताराचा होणार फायदा
कृष्णा नदीतून उंच अशा दुष्काळी भागात पाणी उचलून नेताना पंप हाऊसची गरज पडणार आहे. मात्र, येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्यांतून लगतच्या शेतकऱ्यांना पाणी देताना बहुतांश ठिकाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेतला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडणार नाही.