वाठार स्टेशन : विदर्भ, मराठवाडा लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती साताऱ्यापेक्षा भयानक आहे. ही जाणीव ठेवत कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टने उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या गावातील बसस्थानक परिसरात स्वतंत्र विंधन विहीर खोदली. त्याठिकाणी पाण्याच्या टाकीसह पाईपलाईनची जोडणी केली आहे. यामुळे मुरूम या दुष्काळी गावाची तहान भागणार आहे. नुकताच या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मुरूम या गावात सोळशी शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, राज्य परिवहन महामंडळाचे उमरगा आगार प्रमुख मंगेश कांबळे, अनंतराव मुंडीवाले, राजूशेठ लोढा, शंकर विभुते, विनायक रामगढे, माजी नगराध्यक्ष जे.टी लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती.उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या गावाने सोळशी येथील शनैश्वर देवस्थानकडे पिण्याच्या पाण्याबाबत मदत मागितली होती. त्यानुसार मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी या गावाच्या बसस्थानकात काही महिन्यांपूर्वी विंधन विहीर खोदली होती. त्यास चांगले पाणी लागल्यानंतर याच ठिकाणी पाण्याची स्वतंत्र टाकी बांधण्यात आली. तसेच या विंधन विहिरीवर मोटर व पाईपलाईनची जोडणी देवस्थान मार्फत करण्यात आली आहे. या योजनेमुळे आता बसस्थानकातील पाणीटंचाई दूर झाली आहे.मठाधिपती नंदगिरी महाराज म्हणाले, ‘ज्या भागातील आरोग्य, शिक्षण व आहार पद्धती सुधारली. तर तो भाग सुधारला असे समजावे. शिक्षण आरोग्य व व्यसनमुक्त अशा चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे.गावाबाबतचा अभिमान सर्वांना असतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने गावच्या विकासाठी योगदान दिले पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातही या गावाच्या विकासासाठी शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मदत करेल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. (वार्ताहर) शनैश्वर देवस्थान ट्रस्ट आजपर्यंत नेहमीच समाजकार्यात आघाडीवर राहिले आहे. दरवर्षी देवस्थान ट्रस्ट मार्फत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. मोफत हुंडा विवाह सोहळा, रक्तदान शिबिरे, ग्रंथमहोस्तव, मोफत रुग्णसेवा असे अनेक उपक्रम राबवले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावच्या बसस्थानकात पाणीटंचाई जाणवत होती. प्रवाशांचे पाण्याविना हाल होत होते. यासाठी स्वतंत्र विंधन विहीर, मोटर,पाईपलाईन, पाण्याची टाकी देवस्थान ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे.- नंदगिरी महाराज, सोळशीउस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम येथील बसस्थानकात शनैश्वर देवस्थान तर्फे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन मठाधिपती नंदगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते झाले.
दुष्काळी भाग मदतीला धावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2016 10:08 PM