सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून धरणातही पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात येत असून टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध भागातून धरणातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटू लागला असून आता कृष्णा, उरमोडी, कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी १७ नोव्हेंबरला कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयनेसह प्रमुख मोठी धरणे आहेत. यामध्ये कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी आदी धरणांचा समोवश आहे. यामधील कोयनेसह काही धरणांचे पाणी हे सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी सोडण्याची तरतूद आहे. मात्र, यावर्षी पाऊस कमी असल्याने या धरणांतच कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाई वाढणार असल्याने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच याबाबत पालकमंत्र्यांनीही धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील शेतकरी पाणी सोडण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातील असंख्य शेतकरी कृष्णा, उरमोडी, कण्हेर डाव्या कालव्यातून पाणी घेऊन शेती करतात. परंतु या हंगामात सातारा सिंचन विभागाकडून आमच्या हक्काचे पाणी दुष्काळ टंचाईच्या नावाखाली अधिकाराचा गैरवापर करून सोडले जात आहे. एकप्रकारे या पाण्याची चोरी होत आहे. त्यातच ही बाब पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. तसेच लेखी आश्वासन देऊनही कृष्णा नदी पात्र आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यास सुडभावनेने टाळाटाळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत.तसेच कमी पावसाचे कारण सांगून जिहे-कठापूर योजनेचे व आमच्या हक्काचे पाणी नियमबाह्य पध्दतीने पळविले जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १७ नोव्हेंबर रोजी सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेणार आहोत. तरी याची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती आहे.निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघ अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, राजेंद्र शेडगे, बजरंग कणसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.